Breaking News

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सुभाष नरळे

सातारा, दि. 12 (प्रतिनिधी) : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा सन्मान तब्बल 54 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच माण तालुक्याला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माणचे माजी आमदार दिवंगत आमदार सदाशिवराव पोळ यांचे कट्टर समर्थक सुभाष नरळे यांना अध्यक्षपदी संधी दिली. अध्यक्ष पदासाठी नरळेंच्याविरोधात भरलेला अर्ज फलटण तालुक्यातील सोमंथळीचे जिल्हा परिषद सदस्य महादेव पोकळे यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने नरळे यांची बिनविरोध निवड झाली. 
जिल्हाधिकारी अश्‍विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा परिषदेच्या छ. शिवाजी सभागृहात निवडीचा कार्यक्रम झाला. तत्पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंंबाळकर, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार प्रभाकर घार्गे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या प्रमुख उपस्थित राष्ट्रवादीची बैठक झाली. अध्यक्षपदासाठी सुभाष नरळे यांच्यासह खंडाळ्याचे आनंदराव शेळके-पाटील, पुसेसावळीचे मानसिंगराव माळवे हे दोघे इच्छुक होते. आपल्याला अध्यक्षपद द्यावे, अशी त्यांनी मागणी रामराजे यांच्याकडे केली होती. मात्र, माण तालुक्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन माण तालुक्यातील राष्ट्रवादीचे संघटन मजबूत करण्याच्या हेतूने सुभाष नरळे यांना संधी देण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला. रामराजे यांनी नरळे यांच्या नावाची घोषणा केली.
दरम्यान, यानंतर राष्ट्रवादीने सुभाष नरळे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचवेळी काँगे्रसच्यावतीने महादेव पोकळे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. छाननीमध्ये हे दोन्ही अर्ज वैध ठरल्याने अध्यक्ष पदासाठी मतदान घ्यावे लागणार होते. मात्र, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी समजूत काढल्यानंतर महादेव पोकळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी सुभाष नरळे यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली. यानंतर नरळे यांच्या समर्थकांनी जिल्हा परिषदेच्या बाहेर जोरदार फटाकेबाजी करुन आनंदोत्सव साजरा केला.
सातारा जिल्हा परिषदेची स्थापना सन 1962 झाली असून आतापर्यंत माण तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यास अध्यक्ष पदापर्यंत पोहोचू दिले नव्हते. दिवंगत माजी आमदार सदाशिवराव पोळ यांना उपाध्यक्ष पदावर समाधान मानावे लागले होते. मात्र, नरळे यांच्या रुपाने माण तालुक्याला 54 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अध्यक्ष पदाचा सन्मान मिळाला.