Breaking News

सेक्स रॅकेट प्रकरणावरून भाजपा-शिवसेनेत राडा

कल्याण, दि. 12 - उल्हासनगरमधील सेक्स रॅकेट प्रकरणातील आरोपी शोभा गमलाडू हिचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत असणारे फोटो फेसबुकवर व्हायरल झाल्यावर शिंदे यांची बदनामी केल्याचा आरोप करत केडीएमसीचे भाजपा परिवहन सदस्य सुभाष म्हस्के यांच्या तोंडाला शिवसनिकांनी शाई फासून त्यांना मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी कल्याण पूर्वेत घडली. आपल्या घरी पायी जात असताना शिवसनिकांनी हा हल्ला केला असल्याचे केडीएमसीचे भाजपा परिवहन सदस्य सुभाष म्हस्के यांनी माध्यमांना सांगितले. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण शिवसेनेच्या कोणत्याच नेत्याची अथवा शिवसेना पक्षाची बदनामी केली नसल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. ‘याबाबत पोलिसात तक्रार केल्यास हात-पाय तोडून जीवे ठार मारू’ अशी धमकी दिल्याचे देखील म्हस्के यांनी स्पष्ट केले. या प्रकारांमुळे मात्र भाजपा आणि शिवसेनेच्या राज्यात कायदा सुव्यवस्था ठेवण्याची तारेवरची कसरत पोलिसांना करावी लागत आहे.
दोन दिवसा पूर्वी उल्हासनगरमधील शिवसेनेच्या पदाधिकारी असलेल्या गमलाडू हिला सेक्स रॅकेट प्रकरणी ठाणे समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला शिवसेनेची कार्यकर्ती असल्यामुळे तिचे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याबरोबर असलेले फोटो फेसबुक आणि सोशल मीडियावरुन व्हायरल करून पालकमंत्री आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांची बदनामी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली असल्याचा आरोप शिवसनिक करीत आहेत. याच माध्यमातून कल्याण पूर्वेतील भाजपाचे परिवहन सदस्य सुभाष म्हस्के यांनीच यांच्या फेसबुक पेजवरून हे फोटो व्हायरल केल्यामुळे रविवारी दुपारी शिवसनिकांनी म्हस्के यांना रस्त्यात गाठून त्यांना मारहाण करून त्यांच्या तोंडावर शाई फेकून निषेध केला.