Breaking News

रस्ते नुकसानी ः ठेकेदारावर कारवाई करा

सांगली, दि. 18 - गेल्या तीन वर्षात महापालिका क्षेत्रात झालेल्या जवळपास 80 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या नुकसानीस संबंधित ठेकेदारच जबाबदार आहेत. करारपत्रातील नियमानुसार तीन वर्षातील देखभाल दुरुस्तीची जबाबदारी त्यांचीच असल्याने या रस्त्यांची डागडुजी ठेकेदारांकडून करुन घ्यावी, अशी मागणी उपमहापौर गटाने आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याकडे केली.
उपमहापौर विजय घाडगे, नगरसेवक शेखर माने व अन्य सदस्यांनी यासंदर्भात आयुक्तांना निवेदन दिले आहे. गेल्या तीन वर्षात शासन निधी, महापालिका निधी, जिल्हा नियोजन समिती तसेच मुख्यमंत्र्यांनी मंजूर केेलेल्या विशेष निधीतून रस्त्यांची जवळपास 80 कोटी रुपयांची कामे झाली आहेत. या कामांच्या दर्जाबाबत आता प्रश्‍नचिन्हे उपस्थित होत आहे. एका पावसात यातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. कामाचे करारपत्र करताना संबंधित रस्त्याच्या डागडुजीची 3 वर्षातील जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे. त्यामुळे ठेकेदारांना संबंधित रस्त्यांची दुरुस्ती करुन देण्याबाबत आयुक्तांनी आदेश द्यावेत, जे ठेकेदार कराराचा भंग करतील त्यांच्यावर तातडीने कारवाईसुद्धा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या सत्ताधारी गटाच्या बैठकीत रस्त्यांच्या कामाबद्दल तक्रार करण्यात आली होती. गेल्या दोन वर्षात महापालिका क्षेत्रात 60 कोटींहून अधिक रकमेचे रस्ते झाले आहेत, पण नुकत्या
च झालेल्या पावसाने शहरातील अनेक रस्ते उघडले आहेत. या कामात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला होता. सदस्य आक्रमक झाल्यानंतर या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आश्‍वासन आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी दिले आहे. उपमहापौर गटाने पुन्हा याप्रकरणी ठेकेदारांवरच डागडुजीची जबाबदारी सोपवावी, अशी मागणी आता केली आहे.