Breaking News

पीक विमा शेतकर्‍यांच्या खात्यावर

सांगली, दि. 18 - पंतप्रधान पीक विमा योजनेत कर्जदारांना समाविष्ट करुन घेण्यासाठी जिल्हा बँकेने आदेश जारी केला. आदेशानुसार 28 हजार 255 शेतकर्‍यांच्या कर्जखात्यावर 1 कोटी 69 लाख 48 हजार 860 रुपयांचा बोजा पडणार आहे. जिल्ह्यात भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस, भुईमूग या पाच पिकांसाठी कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांकडून ही सक्तीची वसुली असून इतर शेतकर्‍यांसाठी विमा उतरणे ऐच्छिक आहे. त्याबाबतचा केंद्र शासनाचा अध्यादेश बँकेला प्राप्त झाला आहे.
बँकेने सूचना पत्र जारी केले असून ते सर्व 217 शाखा आणि विकास संस्थांना प्राप्त होईल. त्यानुसार कार्यवाही सुरु करुन येत्या 31 जुलैपर्यंत सर्व कर्जदार शेतकर्‍यांना पीक विमा हप्ता जमा झालेला
असेल. त्याचा हप्ता कापूस पिकासाठी संरक्षित रकमेच्या 5 टक्के, तर अन्य पिकांसाठी 2 टक्के ठरविला आहे. या विमा योजनेत एकूण 15 पिकांचा समावेश आहे. पैकी 9 पिके जिल्ह्यात घेतली जातात. त्यातील पाच पिकांना बँकेने कर्जपुरवठा केला आहे. भात, ज्वारी, बाजरी, सोयाबिन, कापूस, मका, भुईमूग, उडीद आणि मूग पिकांचा समावेश आहे. नव्या योजनेत पिकाच्या बाजारभावाच्या तुलनेत विमा परतावा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय, नुकसानीचा आढावा घेतानाचे निकष शिथिल व पारदर्शी करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी सरकारची अपेक्षा आहे. भाजपचे खासदार, आमदार आणि गावोगावचे नेते याकामी मार्केटींग करताना दिसणार आहेत. या योजनेत बिगर कर्जदार शेतकर्‍यांना विमा उतरवता येणार आहे. त्यासाठी पेरणी दाखला, सातबारा 8 अ उतारा आणि प्रस्ताव आवश्यक आहे. हेक्टरी भात 780, बाजरी 480, मका 500, तूर 560, मूग 360, उडीद 360, भुईमूग 600, सोयाबीन 720, सूर्यफूल 440, कापूस 1800 रुपये विमा हप्ता आहे.