Breaking News

आघाडीचा निर्णय प्रदेश पातळीवर ः अशोक चव्हाण

 पुणे, दि. 18 - पुणे व सातारा जिल्ह्यांची काँग्रेसची जबाबदारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपविली आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी स्पष्ट केले. स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करण्याचा निर्णय प्रदेश पातळीवर घेणार नसून, तो जिल्हा व स्थानिक पातळीवरील परिस्थितीनुसार घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 
पुणे शहर व जिल्हा काँग्रेस समितीची बैठक काँग्रेस भवनात झाली. नगरसेवक, पदाधिकारी, प्रमुख स्थानिक नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बो
लत होते. पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील पक्षाचे गटनेते शरद रणपिसे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, शहराध्यक्ष रमेश बागवे, विश्‍वजित कदम, अभय छाजेड आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करण्याला पुण्यातील कार्यकर्त्यांनी विरोध केला का, अशी विचारणा केल्यावर चव्हाण म्हणाले, ‘आघाडीसंदर्भात आजच्या बैठकीत संमिश्र सूर उमटला. दोन्ही बाजूंनी मते व्यक्त झाली. दोन तासांच्या बैठकीत असे निर्णय होऊ शकत नाहीत. वर्किंग ग्रुप सखोल चर्चा करून त्याबाबत निर्णय घेईल. काँग्रेसने प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी पक्षाच्या नेत्यांवर व पदाधिकार्‍यांवर सोपविली आहे.“
‘पृथ्वीराज चव्हाण राज्याचे काम पाहतील, तसेच त्यांच्याकडे पुणे व सातारा जिल्ह्याची जबाबदारी सोपविली आहे. पुण्यात त्यांच्यासोबत हर्षवर्धन पाटील, विश्‍वजित कदम, प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत हांडोरे आहेत. नवीन प्रभाग रचनेनुसार निवडणूक लढविण्यासाठीच्या राजकीय परिस्थितीचा आढावा आजच्या बैठकीत घेतला. पुण्यातील मेट्रो, पाणीपट्टी वाढ आदी प्रश्‍नांवर चर्चा झाली. प्रत्येक जिल्ह्यांसाठी नियुक्त केलेल्या समित्या तेथील स्थितीचा आढावा घेत निर्णय घेतील. काही जुने, काही नवे चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरवू. निवडून येण्याची क्षमता हा मुख्य निकष असेल,“ असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारवर कोठेही अंकुश दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली. चव्हाण म्हणाले, ‘फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील ट्विटर वाद रंगला. कोणी अधिकारी ऐकत नसल्याचे मुख्यमंत्रीच म्हणतात. एकनाथ खडसे यांच्या चौकशीपूर्वीच मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांनी त्यांना क्लीन चिट‘ दिली. मंत्रिमंडळाचा विस्तार करताना भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांचा समावेश केला आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली नाही, नवीन कर्जही मिळत नाही. काँग्रेसच्या मागणीमुळे केंद्र सरकारने तूरडाळ स्वस्त धान्य दुकानातून देण्याचे मान्य केले.“