धनंजय धवड-राजेंद्र जवंजाळ यांची कौशल्य कुटील निती
सार्वजनिक बांधकाम : प्रकल्पाची किंमत वाढविली; मुदतीपुर्वीच टोल वसुलीला संमती
मुंबई-नाशिक, विशेष/प्रतिनिधी, दि. 20 - निवृत्त साबांसचिव धनंजय धवड आणि तत्कालीन कार्यकारी अभियंता व विद्यमान अधिक्षक अभियंता यांनी संगनमताने टेंडर प्रक्रियेत अनियमितता करून भुजबळांच्या मर्जीतील कंत्राटदारांना लाभ मिळवून दिला. तसेच काही ठेकेदारांना हेतुपुरस्सर टेंडर प्रक्रियेपासून वंचित ठेवले. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन कॅटने आपल्या अहवालात गंभीर बाबी नमूद केल्या आहेत.या संदर्भात हाती आलेल्या कॅटच्या अहवालातून प्राप्त माहिती अशी की, 23 फेब्रुवारी 20
07 रोजी चिंचोली कमान अंजूर फाटा ते मानकोळी (भिवंडी) हा 26.425 किमी.चा चारपदरी राज्यमहामार्ग मंजूर झाला. यावेळी या मार्गासाठी अंदाजपत्रकात 96 कोटींची मंजूरी देण्यात आली होती. जेंव्हा या प्रकल्पाला मंजूरी मिळाली तेंव्हा 16 वर्ष 9 महिने कन्सेशन पिरियड मान्य करण्यात आला ज्यात रस्ता बांधकामाच्या 2 वर्षाचा समावेश होता.
प्रत्यक्षात 6 मे 2008 रोजी या प्रकल्पाचे टेंडर काढण्यास मंजूरी दिली गेली तेंव्हा प्रकल्प खर्च 120.51 कोटीवर नेण्यात आला. कन्सेशन पिरियड देखील 24 वर्ष 3 महिने करून बांधकामासाठी 2 वर्षांऐवजी 30 महिन्यांची मुदत वाढवून देण्यात आली. 30 जून 2008 आणि 10 जून 2009, 28 ऑगस्ट 2009 या कालावधीत कार्यारंभ आदेशही दिले. हे काम दोन टप्प्यात पुर्ण करायचे होते. काम पुर्ण झाल्यानंतर टोल वसुली करण्यास मान्यता होती. तथापि काम पुर्ण होण्याआधीच टोल वसुली सुरू झाली. अंतीम काम पुर्णत्वाचे प्रमाणपत्र अद्याप (अहवाल तयार होईपर्यंत) दिले गेले नसतानाही टोल वसुलीची अधिसुचना काढण्यात आली. अनियमिततेशी संबंधित असलेल्या या सर्व बाबी तत्कालीन कार्यकारी अभियंता राजेंद्र जवंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलात आणल्या गेल्याचे कॅटच्या अहवालात स्पष्टपणे नमूद आहेत. आज या ठिकाणी राजेंद्र जवंजाळ यांच्या कार्यशैलीचा त्रोटक नमुना दाखल केला आहे. यापेक्षाही गंभीर बाबी कॅटने आपल्या अहवालात नमूद केल्या आहेत. काय आहेत कॅटचे गंभीर ताशेरे? राजेंद्र जवंजाळ यांनी भुजबळांसाठी कोणते नियोजन केले? धवड यांनी जवंजाळ यांना कसे अभय दिले? हे काम कोणत्या कंत्राटदारांना दिले? हे काम त्यांनाच मिळेल यासाठी जवंजाळ-धवड यांनी कोणती शक्कल लढविली? या अनियमिततेवर कॅटचे म्हणणे काय आहे? याविषयी सविस्तर वृत्तांत उद्याच्या अंकात - (क्रमशः)