Breaking News

नैसर्गिक-अनैसर्गिक संस्कृती...

हिंदू बहुजन समाजाच्या संस्कृतीची संपन्नता फार महान आहे. परंतु माणूस जर बौध्दिक गुलामीत गेला तर त्याच्या महान संस्कृतीचीही त्याला लाज वाटावी,  अशीच काहीशी अवस्था ब्राह्मणी संस्कृतीने हिंदू बहुजनांची केली आहे. ब्राह्मण आणि हिंदू बहुजन यांच्या दोघांच्या संस्कृतीत मूलभूत बदल काय असा जर कुणी  प्रश्‍न केला तर त्याचे उत्तर अगदी साधे आणि सोपे आहे. ब्राह्मणी संस्कृती ही अनैसर्गिक तर हिंदू बहुजन संस्कृती ही नैसर्गिक आहे. आता आपण प्रश्‍न विचाराल  की हे अनैसर्गिक आणि नैसर्गिक कोणत्या आधारावर ठरवले. त्याचेही उत्तर अगदी साधे आणि सोपे आहे. विश्‍वातला कोणताही प्राणी हा जगण्याच्या संघर्षात  आपले दररोजचे अन्न मिळविण्याकरीता संघर्ष करतो आणि त्याची भूक भागली की सगळ्यांशी गुण्या-गोविंदाने रहातो. अगदी हिंस्त्र पशु असला तरी भूकेशिवाय  तो त्याच्या भक्ष्याची शिकार करित नाही. निसर्गात सार्‍यांशी मिळून मिसळून रहाणे आणि आपल्यापासून कोणाला त्रास होणार नाही याची दक्षता घेणे, ही  निसर्गसंपन्न बाब प्राणीमात्रात असते. माणूस हा देखिल निसर्गाचे अपत्य मानला जातो. परंतु भाषा आणि विचार करण्याच्या गुणामुळे तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा  ठरतो. परंतु एवढाच हा फरक लक्षात घेतला तरी माणसाचे जीवन निसर्गाशी तादात्म्य पावणारेच असते, किंबहुना ते तसेच असले पाहिजे ही अपेक्षा असते. हिंदू  बहुजन समाजाची सांस्कृतिक परंपरा अशीच आहे आपल्या परंपरागत जगण्याच्या साधनांनी उदरनिर्वाहचा प्रश्‍न सोडवायचा, इतरांनाही त्यात होईल तेवढी मदत  करायची. आपल्या पुढच्या सात पिढ्यांनी बसून खावे किंवा त्यांना जगताना कोणताही संघर्ष करावा लागू नये या विचारांनी अप्पलपोटी होणारी संस्कृती हिंदू  बहुजनांमध्ये रुजली नाही. आजच्या भाकरीचा प्रश्‍न सोडवायचा, निवारा होईल एवढी जागा पुरेशी म्हणून बाकी कसलाही हव्यास ठेवायचा नाही. याउलट ब्राह्मणी  संस्कृती आहे. त्यांचा पहिला प्रश्‍न अन्न मिळवायचा नसतो, तर मानव समुदायाला आपल्या अधिपत्याखाली किंवा आपल्या गुलामीत कसे ठेवता यईल, असा ते  प्रथम विचार करतात. ब्राह्मणी समुदायाची याबाबातीत जी एकी आपणास दिसते ती त्यांच्या या मूळ विचारधारेत दडलेली आहे. ब्राह्मणी संस्कृतीतील व्यक्ती इतर  विचार प्रवाहांबरोबरही जुळतात ते केवळ त्यांच्या या सामायिक ध्येय साध्य करु पहाणार्‍या शक्तींना मजबूत करता यावे म्हणूनच! अर्थात ब्राह्मणी समुदाय  एकट्या भारतातच एकवटला असल्यामुळे त्यांनी सहाजिकच ब्राह्मणेत्तर समुहाला आपले गुलाम करुन ठेवण्याचे ध्येय निश्‍चित केले आहे. त्यामुळे गेल्या पाच हजार  वर्षांचा इतिहास ब्राह्मणी-अब्राह्मणी परंपरा पाहिली तर अब्राह्मणी शक्तीशाली असूनही त्यांचे एक़मेव आणि समान असे ध्येय कधीच नसल्यामुळे त्यांना वेगळे  पाडणे ब्राह्मणी संस्कृतीला कायम सोपे झाले आहे. भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळाच्या इतिहासात जर आपण पाहिले तर हीच बाब आपणास स्पष्ट होताना दिसते.  स्वातंत्र्योत्तर काळात संवैधानिक लोकशाही लागू झाल्यावर ब्राह्मणी संस्कृती या देशाच्या राजकीय सत्तेवर सार्वभौमपणे राज्य करु लागली. कारण या देशातील हिंदू  बहुजनांना त्यांनी ब्राह्मणी धर्मसंस्थांच्या आधारे वैचारिक गुलाम बनवून ठेवले होते. परंतु म्हणतात ना कोंबडे झाकून ठेवले म्हणून सूर्य उगवायचा रहात नाही!  संवैधानिक अधिकारातून मिळालेला शिक्षणाचा अधिकार, यातून इतिहासाची झालेली जाणीव या गोष्टी हिंदू बहुजनांमध्ये वाढीस लागल्या. तसतसा या देशाच्या  राजकीय सत्तेत मवाळ ब्राह्मणीकरण स्वीकारलेल्या काँग्रेसला हिंदू बहुजनांनी चांगलेच ओळखले. त्यातूनच त्यांनी काँग्रेसच्या परंपरागत मतदार राहाण्यास नकार  दिला. पण त्याजागी आक्रमक ब्राह्मणीकरण लादणार्‍या शक्ती विराजमान होताना दिसू लागताच हिंदू बहुजनांनी आता अब्राह्मणी ध्रुवीकरणाला सुरुवात केली.