विरोधकांचा मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल !
आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवू; मुख्यमंत्र्यांचे विधीमंडळात निवेदन
मुंबई, दि. 20 - अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील घटनेचे पडसाद मंगळवारी पुन्हा एकदा दोन्ही सभागृहात बघायला मिळाले असून, विरोधकांनी मुख्यमंत्र्यावर चांगलाच हल्लाबोल केल्याने, विधीमंंडळातील वातावरण ऐन पावसाळयात चांगलेच तापले होते. विरोधकांनी सभागृहात काळ्या फिती लावून हजेरी लावली. कोपर्डी बलात्कार प्रकरणावरील चर्चेत राणे यांनी फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, राज्यात गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्याचा गाजावाजा मुख्यमंत्री करतात, अहो तुम्ही गुन्ह्यांची नोंदच केली नाही. जळगावचे, नागपूरचे सगळे गुंड कोणत्या पक्षात आहेत, याचा सर्व्हे करा भाजपचेच नाव समोर येईल. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे. जे नागपूर सांभाळू शकत नाहीत, ते राज्य काय सांभाळणार? असा सवाल उपस्थित करून राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे मुंडे म्हणाले, ‘आरोपींना नागरिकांनी पकडले आहे. गुन्हा नोंदविण्यास पोलिसांना उशिर का झाला. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. कोपर्डी बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी केवळ ट्विट केले. मुख्यमंत्री कोपर्डीला गेले नाहीत परंतु मातोश्रीवर मेजवाणी घेण्यास गेले. गावाकडची घटना म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले गेले. वाघाच्या जबड्यात हात घालू म्हणणार्या मुख्यमंत्र्यांनी आरोपीचा हात तरी पकडायचा होता. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. सरकारला जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटू द्या, असा हल्ला मुंडे यांनी केला.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर टीका करत म्हणाले की, फडणवीस सरकारच्या राज्यात महिला सुरक्षित नसून, मुख्यमंत्र्यांना कोपर्डीच्या घटनेपेक्षा उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणे उचित वाटल्याचे सांगत, मुख्यमंत्र्यावर पवारांनी निशाणा साधला. या कारवाईमध्ये दिरंगाई करणार्या पोलिसांवर सरकार काय कारवाई करणार असा सवाल देखील अजित पवार यांनी उपस्थित केला. माजी मंत्री बाळासाहेब विखे-पाटील यांनी सरकारला कोपर्डी घटनेचे गांभिर्य नसल्याचे म्हटले आहे. ही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट का दिली नाही असा सवाल त्यांनी विधानसभेत उपस्थित केला. दरम्यान विरोधकांच्या प्रश्नांला उत्तर देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आरोपींना फाशीची शिक्षा होऊन, भविष्यात अशाप्रकारचे कृत्य करण्याचे कोणाचे धाडस होणार नाही, हा समाजात संदेश देऊ. कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवू, याप्रकरणात पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप झाला. मात्र, तो संपूर्णपणे चुकीचा असल्याचा दावा देखील मुख्यमंत्र्यांनी केला. पोलीस घटनास्थळी 31 मिनिटांत दाखल झाले होते, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विधीमंडळात कोपर्डी बलात्कारप्रकरणावर चर्चा झाली. विरोधकांनी या प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. चर्चेअंती मुख्यमंत्र्यांनी सभागृहासमोर निवेदन सादर केले. अवैध दारु व्यवसायाप्रकरणाची शिक्षा 3 वर्षांवरून 10 वर्षांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. तसेच ज्या पोलीस अधिकार्याच्या हद्दीत अवैध दारु सापडेल, त्या अधिकार्यावरही कारवाई करु, असेही फडणवीस म्हणाले.