Breaking News

मनरेगाच्या कामात माजी सरपंचाचे पितळ उघड

पालम प्रतिनिधी, दि. 19 - तालुक्यातील मौजे पारवा ते शेखराजुर अंतर्गत पांदण रस्त्याचे काम बोगस जॉबकार्ड काढुन कागदोपत्री पांदन रस्ता पुर्ण झाल्याचे दाखवुन पारवा येथील माजी सरपंच व इतर संबंधीतांनी शासनाची दिशाभुल करून शासनाला पाच लाखाचा चुना लावण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पालम तालुक्यातील पारवा ते शेख राजुर अंतर्गत मनरेगाच्या माध्यमातुन पांदन रस्ता मंजुर झाला होता. परंतु तत्कालीन सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, व इतर पदाधिकार्‍यांनी सदरील कामाचे बनावट जॉबकार्ड काढुन सात ते आठ वेळेस शासनाचा निधी लाटल्याची माहिती विद्यमान सरपंच व इतर पदाधिकार्‍यांच्या लक्षात आले. या कामात एकुण 5 लाख 11 हजर 410 रूपयाची अफरा तफर झाली असुन पारवा येथील सरपंचानी या प्रकरणी शासकिय दस्तावेज हाताळले असता हे संपुर्ण काम बोगस असुन पारवा ते शेख राजुर पांदन रस्ता कधीच झाला नसल्याचे निदर्शनास आले. ज्या ठिकाणी काम झाले असे दाखविण्यात आले होते त्या ठिकाणी सरपंच,उपसरपंच,पोलिस पाटील व इतर पदाधिकार्‍यांनी जावुन पाहणी करत सदरील बनावटी रस्त्यावर काढलेले छायाचित्र आमच्या प्रतिनिधीकडे देवुन या प्रकरणी आपण जिल्हाधिकार्‍यांना तक्रार देणार असल्याचे सांगीतले. जिल्ह्यात मनरेगा मार्फत होणार्‍या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असुन या प्रकरणी वरिष्ठांनी लक्ष देवुन शासनाचा निधी हाडक करणार्‍या भ्र्रष्टाचार्‍या विरोधात कडक धोरण अवलंबावे अशी मागणी या वेळी गावकर्‍यांनी केली.