Breaking News

वृक्षतोडीसह वृक्षारोपण करणे काळाची गरज

अहमदनगर, दि. 18 - कुठलाही सामाजिक व समाजोपयोगी उपक्रम यशस्वी करायचा असल्यास त्यामध्ये लोकसहभाग जसा महत्त्वाचा आहे, तसाच विद्यार्थ्यांचा सहभागही महत्त्वाचा आहे. झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचल्यास व त्यांनी मनापासून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केल्यास येत्या 10 ते 12 वर्षात सगळीकडे चित्र बदललेले दिसेल. झाडांची संख्या वाढलेली दिसेल. केडगाव येथे एस. एस. मोहिते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने वृक्षारोपण करण्याचा राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे. पर्यावरणाचा ढासळलेला समतोल पूर्वपदावर येण्यासाठी वृक्षतोड थांबविणे व वृक्षारोपण करणे याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे प्रतिपादन राज्याच्या सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगांवकर यांनी केले.
केडगाव येथे एस. एस. मोहिते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राज्याच्या
सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगांवकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहिते, सचिव निर्मला मोहिते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संपर्क विभागप्रमुख राजाभाऊ मुळे, खजिनदार अजय मोहिते, मुख्याध्यापिका आर. जी. जाधव, आर. डी. मोरे, एस. एस. गिते, पी. एम. सादिगले, एम. ए. गुजर, बारवकर, गायकवाड, व्ही. जे. शिंदे, एम. के. वाघमारे, एस. ए. येणारे आदी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहिते म्हणाले की, भारतात युवकांची संख्या मोठी आहे. उद्याच्या सक्षम भारत निर्मितीसाठी युवा पिढीने योगदान देणे आवश्यक आहे. जबाबदारी न झटकता ती स्वीकारण्याची कला प्रत्येकाने अवगत करायला हवी. कारण जबाबदारी वाटून घेतल्यानंतर कुठलेही मोठे वाटणारे काम आपण सहजपणे तडीस नेऊ शकतो, असे ते म्हणाले.
मुख्या. जाधव यांनी प्रास्ताविकात विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेऊन विद्यालयाच्या वतीने वर्षभर राबविल्या जाणार्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सातत्य राखून झाडे जगविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील. विद्यार्थ्यांना जबाबदारी दिल्यास ते ती सक्षमपणे पेलतात, असे सांगितले.