Breaking News

शिक्षा होईल असाच तपास जिल्हाधिकार्‍यांची माहिती

।  कोपर्डी : आरोपींना 25 पर्यंत पोलिस कोठडी

कर्जत, दि, 18 - कोपर्डी येथे घडलेली घटना अमानवीय आहे. खरे आरोपीस अटक होऊन या घटनेची योग्य ती चौकशी सुरू झाली आहे. घटनेतील पुरावे गोळा करणेे, आरोपींना धाक व जरब बसेल, अशी शिक्षा होण्यासाठी पोलिस व प्रशासन काम करीत असल्याचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी सांगितले. 
कर्जत येथे या घटनेच्या निषेधासाठी सर्वपक्षीय, सामाजिक संघटनानी सहा तास रास्ता रोको आंदोलन केले. जिल्हाधिकारी कवडे यांनी यावेळी प्रशासनाची भूमिका मांडली. छत्रपती

शिवाजी महाराज चौकात सकाळी 10 वाजता संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघासह विविध संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलनास सुरुवात केली. कर्जतमधील बाजारपेठेतील व्यवहार सकाळपासूनच बंद होते.
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी हा खटला जलद न्यायालयामार्फत चालविण्याची मागणी करत, सरकारी वकील उज्जवल निकम यांची यासाठी नेमणूक करावी, अशी मागणी केली.
या घटनेवर विधानसभेत देखील चर्चा घडवून आणू. अशा घटनांमध्ये सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये, असे देखील ते म्हणाले. खासदार दिलीप गांधी व आमदार राहुल जगताप यांनी या घटनेची तीव्र शब्दांत निषेध केला. जिल्हाधिकारी अनिल कवडे व पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांच्याशी चर्चा केल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्णयामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी पालकमंत्री ना. राम शिंदे यांना आंदोलनाची माहिती दिली. जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फाळके, नगराध्यक्ष नामदेवराव राऊत, सदस्य प्रवीण घुले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे, राजेंद्र गुंड, अँड़ कैलास शेवाळे, अँड़ बापूसाहेब चव्हाण, सोनाली बोराटे, कृषिराज टकले,अण्णासाहेब सावंत, गंगा बोरुडे, बिभीषण खोसे, राजेंद्र सावंत, सुभाष गागरे, राजाराम जरेकर, मिठू धांडे आदींची भाषणो झाली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, शिवसेनेचे बळीराम यादव, किरण पाटील, नगरसेवक बापूसाहेब नेटके, सचिन घुले, ऋषिकेश धांडे, राहुल नवले, नीलेश तनपुरे, अँड़ बाळासाहेब शिंदे, कोपर्डीचे सरपंच सतीश सुद्रिक, दत्तात्रय भोसले, दीपक तनपुरे, आशिष तनपुरे, नानासाहेब धांडे, दिलीप गरड, अर्जुन शिंदे, लालासाहेब सुद्रिक, जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील 15 वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणातील दोन आरोपींना 25 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपींवर अंडे फेकण्याचा प्रकार
या प्रकरणातील नितीन भुलैमे याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. तर संतोष भवार या आरोपीस काल पोलिसांनी अटक केली होती.  नितीन भुलैमे आणि संतोष भवार या दोघांना आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही 25 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, भुलैमे आणि भवारला न्यायालय परिसरात आणल्यानंतर काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अंडी फेकली.