Breaking News

मुंबईतील धरणांचा पाणीसाठी वाढला

मुंबई, दि. 05 -  मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सर्व धरण क्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावायला सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये पावसाच्या या हजेरीमुळे तलाव क्षेत्रातील पाणीसाठयात वाढ होताना दिसत आहे. दोन दिवसांमध्ये 10 हजार कोटी लिटरने पाणीसाठा वाढला आहे. पाणीसाठा वाढत असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा कमीच असल्यामुळे महापालिका याबाबत समाधानी नाही.
जूनमध्ये तलाव क्षेत्रात पावसाने हजेरी लावली नाही. परंतु जुलैनंतर तलाव क्षेत्रात पावसाचा जोर वाढू लागला आहे. त्यामुळे 1 जुलैपर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणा-या मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा या धरणांमध्ये 12 हजार कोटी लिटर पाणीसाठा होता. परंतु 4 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत या सर्व तलावांमध्ये 22782 कोटी लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांमध्ये 10 हजार कोटी लिटर पाण्याचा साठा वाढलेला दिसून आला. रविवारी उशिरापर्यंत मोडकसागर (96.60 मि.मी), तानसा (110 मि.मी), विहार (90 मि.मी), तुळशी (93 मि.मी), अप्पर वैतरणा (115 मि.मी), भातसा (118 मि.मी) आणि मध्य वैतरणा (162 मि.मी) पावसाची नोंद झाली आहे.
तलाव क्षेत्रात पाऊस चांगल्याप्रकारे पडल्यामुळे महापालिकेत आनंदाचे वातावरण आहे. परंतु आतापर्यंतचा पाणीसाठा विचारात घेतला तरी मागील वर्षीच्या तुलनेत अजूनही दहा हजार कोटी लिटर पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पाणीसाठयाबाबत महापालिका समाधानी नसल्याचे उपायुक्त सुधीर नाईक यांनी स्पष्ट केले. मागील वर्षी 4 जुलैपर्यंत 32 हजार कोटी लिटर पाणीसाठा असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. रविवारी एकाच दिवशी सात हजार कोटी लिटरने पाणीसाठा वाढलेला आहे. दोन दिवसांमध्ये सुमारे 29 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा वाढलेला आहे. त्यामुळे पावसाची संततधार चालू राहिल्यास तलावातील पाणीसाठा झपाटयाने वाढण्याची शक्यता आहे.