नवी दिल्ली, दि. 17 - केंद्रिय मंत्रिमंडळ विस्तारानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना मनुष्यबळ विकास मंत्रीपदावरून दूर सारत त्यांना वस्त्रोद्योग मंत्रीपद देवून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार धक्का दिला होता, त्यांनतर शनिवारी स्मृती इराणी, सदानंद गौडा आणि राजीव प्रताप रुडी यांचं केंद्रीय कॅबिनेट कमिटीचे सदस्यत्व काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे स्मृती इराणीनां हा दुसरा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. केंद्रीय मंत्रीमंडळ फेरबदलानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट समितीमध्येही मोठे फेरबदल केले आहेत. सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या पहिल्या मंत्रिमंडळ फेरबदलात मोठे बदल केले आहेत. स्मृती इराणी यांच्याकडून मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून घेऊन प्रकाश जावडेकर यांच्याकडे या मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. इराणी यांना थेट वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आले आहे. सदानंद गौडा यांची कौशल्य विकास मंत्रीपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांचेही समितीचे सदस्यत्व काढून घेण्यात आले आहे. मनुष्यबळ विकास मंत्रीपद स्वीकारणार्या प्रकाश जावडेकरांचे समितीचे सदस्यत्व कायम ठेवण्यात आले आहे.