Breaking News

पेमा खांडू अरूणाचलचे मुख्यमंत्री?

नवी दिल्ली, दि. 17 - सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अरूणाचलमधील राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणण्याचा निर्णय दिल्यानंतर, शनिवारी नाबाम तुकी यांनी  आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्त केला. सर्वोच्च न्यायालयाने आदेशानंतर शनिवारी दुपारी एक वाजेपर्यंत तुकी यांना विधानसभेत  बहुमत सिद्ध करायचे होते. पण त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला.मुख्यमंत्री नबाम तुकी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांंनी काँग्रेसला सत्ता  स्थापन करण्यास सांगितले आहे. पेमा खांडू यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्यात आले आहे.
न्यायालयाने राज्यपालांचा निर्णय घटनाबाह्य ठरविताना 15 डिसेंबर 2015ची स्थिती पूर्ववत करण्याचा आदेश दिला होता. या निर्णयामुळे राज्यात पुन्हा काँग्रेसचे  सरकार स्थापन झाले होते आणि नबाम तुकी यांनी पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली होती. तुकी यांना पुन्हा एकदा बहुमत चाचणी  घेण्याचे आदेश दिले होते. शनिवारी होण्यार्‍या बहुमत चाचणीपूर्वी नबाम तुकी यांनी राजीनामा दिला आहे. मात्र, ते काँग्रेसच्या विधिमंडळ बैठकीला हजर होते. पेमा  खांडू यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. तुकी यांनी राजीनामा देताना राज्याला युवा नेतृत्वाची गरज असल्याचे म्हटले होते. काँग्रेसच्या बंडखोर  आमदारांनी नेतृत्व बदल झाल्यास पक्षात परतण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे काँग्रेसने नेतृत्व बदलाचा हा डाव खेळत पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली आहे.