कामगार आयुक्तांच्या कार्यालयास आज टाळे ठोकणार
। 35 हजार बांधकाम कामगारांची नोंदणी धोक्यात । आठ प्रमुख संघटनांचे आज संयुक्तीक आंदोलन
जामखेड (प्रतिनिधी) । 05 - कामगार सहआयुक्त कार्यालयाच्या कामगार विरोधी गलथान कारभारामुळे जिल्ह्यातील पस्तीस हजार बांधकाम कामगारांची नोंदणी धोक्यात आली आहे. तसेच गेली तीन वर्ष कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपासून वंचित राहावे लागले आहे. वारंवार आंदोलने करूनही कार्यालयाच्या कारभारात काडीचीही सुधारणा झालेली नाही. उलट बदलून आलेले अधिकारी कागदपत्रांच्या अडचणी सांगत कामगारांना योजनांच्या लाभांपासून वंचित कसे ठेवता येईल यासाठीच आपली सर्व ताकत पणाला लावत आहे. अशा कार्यालयाचा उपयोग केवळ कामगारांची अडवणूक करण्यासाठीच होत असेल तर असे कार्यालय सुरु ठेवण्याचे काहीच कारण उरत नाही. यामुळेच जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या आठ प्रमुख संघटनानी एकत्र येऊन दिनांक 5 जुलै रोजी (आज)नगर येथील सह आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकून तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्ह्यात पस्तीस हजार कामगारांनी शासनाच्या कल्याणकारी मंडळाकडे शुल्क भरून रीतसर नोंदणी केली आहे. मात्र कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे कामगारांनी भरलेल्या शुल्काचा हिशोब जुळत नसल्याने कामगारांना भरलेल्या शुल्काच्या पावत्या देण्यात आलेल्या नाहीत. शुल्क घेऊन पावत्या न देणे ही कार्यालयाची चूक असताना त्यासाठी कामगारांना गेले तीन वर्ष योजनांच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सिटू) सलंग्न जनशक्ती बांधकाम कामगार संघटना, सर्मपण मजदूर संघ, अहमदनगर जिल्हा इमारत व इतर बांधकाम कामगार संघटना, क्रांती असंघटीत कामगार संघटना, श्रमशक्ती इमारत बांधकाम कामगार संघटना, जनशक्ती श्रमिक संघ, क्षितीज श्रमिक संघ व संगमनेर सेंट्रींग बांधकाम कामगार संघटना या आठ संघटना यासाठी एकत्र आल्या असून त्यांनी अहमदनगर जिल्हा बांधकाम कामगार फेडरेशन च्या माध्यमातून आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून आंदोलनाची जोरदार तयारी सुरु असून अकोलेत सिटू संघटनेच्या वतीने यासाठी बांधकाम कामगारांची जिल्हाव्यापी परिषद घेण्यात आली. राज्य फेडरेशनचे कार्याध्यक्ष भरमा कांबळे व जनवादी महिला संघटनेच्या राज्य अध्यक्ष मरियम ढवळे या परिषदेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून यावेळी उपस्थिती होत्या. जिल्ह्यातील सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन संलग्न सर्व संघटना अहमदनगर जिल्हा बांधकाम कामगार फेडरेशनच्या माध्यमातून आंदोलन करणार आहेत.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत फेडरेशनमध्ये सामील इतर संघटनांच्या वतीने मोर्चाची जोरदार तयारी सुरु आहे. बांधकाम कामगारांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कॉ. अजित नवले, कॉ. सदाशिव साबळे, डॉ. करण घुले, नंदू डहाळे, जयेश कांबळे, संजय दुधाडे, अशोक उगलमुगल, अनिता कोंडा, अमिना शेख, अजित साळवे, शिवाजी भारस्कर, भाऊसाहेब पाडेकर, साहेबराव कुस्तरे, सोपान पुनिळे, व मोनिका कांबळे यांनी केले आहे.