आनंदासाठी आपल्या कामावर प्रेम करा- जी.एम.कडाळे
बुलडाणा, दि. 05 - जो व्यक्ती ज्या ठिकाणी काम करित असेल तो मजुर असो वा कर्मचारी त्याने आपल्या कामावर खूप प्रेम करावयास पाहिजे. आपण जर असे केले तर आपण आपल्या जिवनामध्ये आनंदी राहू. आपला उदरनिर्वाह ज्याच्या भरोश्यावर आहे त्याच्याशी बेईमानी करता कामा नये. परिश्रमाने आनंद, संपत्ती, सुख सारे मिळत असते. असे उद्गार अधिक्षक अभियंता जी.एम.कडाळे यांनी काढले. 28 जून रोजी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. रविवार 26 जूनला दुपारी 12.30 वाजता नालंदा सार्वजनिक वाचनालय विजय नगर बुलडाणा या ठिकाणी म.रा.मागासवर्गीय विद्यूत कर्मचारी संघटनेच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करुन समता दिन पाळण्यात आला. याच दिनाचे औचित्य साधून विद्यूत कंपनीतील मंडळ कार्यालय बुलडाणा येथे जी.एम.कडाळे हे अधिक्षक अभियंता म्हणून रुजू झाले त्या बद्दल त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी सेवानिवृत्त कर्मचारांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संघटनेचे सर्कल अध्यक्ष एस.बी. चव्हाण यांनी स्विकारले तर प्रमुख अतिथी म्हणून एस.के.हनवते केंद्रीय संघटक अकोला, एस.जे. तायडे केंद्रीय उपाध्यक्ष अकोला, पी.एल.हेलोडे परिमंडळ अध्यक्ष अमरावती, एन.आर.वानखडे सल्लागार बुलडाणा हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शाहु महाराज तसेच थोर महापुरुषांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. प्रस्ताविक मंडळ सचिव एस.एस.गवई यांनी केले. सुत्रसंचलन एस.जी.राकडे यांनी तर आभार प्रदर्शन पी.आर.गवई यांनी केले. या कार्यक्रमास महिला प्रतिनिधीसह बुलडाणा सर्कल मधील सर्वच ठिकाणचे प्रतिनिधी उपस्थित होते.
