शरद पवार माझे हिरो ः नाना पाटेकर
पुणे, दि. 18 - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबध आहेत. त्यांच्यासाठी काहीही अशक्य नाही, असे सांगत त्यांच्याकडे मी माझ्या चित्रपटसृष्टीच्या कारकिर्दीच्या सुरवातीपासून पहात आलोय. त्यामुळे ते माझे हिरो आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, अॅड.भास्कर आव्हाड, माणिकचंद समूहाचे रसिकलाल धारिवाल आणि डॉ.शरद हार्डीकर यांना अजित
पवारांच्या हस्ते गुरुजन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळी नाना पाटेकर बोलत होते. पुणेरी पगडी, सन्मान पत्र आणि ज्ञानेश्वरी असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी महापौर प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते शंकर केमसे आदी उपस्थित होते.
नाना पाटेकर पुढे म्हणाले, नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळी भागातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यात आली. पावसाळयापूर्वी दुष्काळी भागातील जवळपास 540 किलोमीटर परिसरातील ओढे-नाल्यांची कामे करण्यात आली. त्यामुळे पावसाचे पाणी साठण्यास सुरवात झाली. शासनाला हेच काम करण्यासाठी किमान 250 कोटींचा खर्च आला असता. ’नाम’ने केलेल्या या कामाला फक्त 7 कोटींचा खर्च आला. याचे श्रेय राज्यातील जनतेला आहे. त्यांच्यामुळे हे सर्व शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अजित पवार म्हणाले की, आजचे पुरस्कारार्थी असलेल्या या गुरुजनांनी देशाला घडवण्याचे काम केले आहे. यांच्याकडून समाजातील प्रत्येक व्यक्तीला नेहमीच प्रेरणा मिळत असते. यांच्यातील नाना पाटेकर यांच्या नाम फाऊंडेशनने केलेल्या कार्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा सरकारपेक्षा त्यांच्यावरच जास्त विश्वास असल्याचे पहायला मिळते. अशा शब्दात त्यांनी नाम फाऊंडेशनच्या कार्याच्या गौरव त्यांनी केला.