इमारतींनी पार्किंग खाल्याने वाहतुक कोंडी कायम
। वाहतुक शाखेच्या आशिर्वांदाने रस्त्यावरच वाहने उभी केल्याने वाहतुक कोंडींचा प्रश्न
अहमदनगर, दि. 11 - शहरातील मुख्य रस्ता समजला जाणार्या दिल्लीगेट भागामध्ये सतत दुचाकी व चारचाकी वाहने अस्ताव्यस्त लावलेली असल्याने अनेकदा वाहतुक कोंडीला तोंड द्यावे लागते.यावरुन शहर वाहतुक शाखेचे नियंत्रण नसल्याने वाहतुक कोंडी हि नित्याचीच बाब झाली आहे.विविध समस्यामुळे तसेच खड्डयांच्या कृपेने शहरातील दिल्लीगेट, मार्केटयार्ड, पत्रकार चौक, लालटाकी, अप्पू चौक अदि ठिकाणी अपघातांना कायमच निमंत्रण दिले जाते. या भागातुन तर विद्यार्थी, पादचारी, दुचाकीस्वार आणि सायकलस्वार यांना मोठी कसरत करावी लागते. पावसाच्या काळात पाणी साचल्यानंतर तर जीव मुठीत धरुनच या रस्त्याने चालावे लागते. हा त्रास नगरकर अनेक दिवसांपासून सहन करत असले तरी आता महापौर आणि उपमहापौर यांनी सांगीतल्याप्रमाणे आणखी एक वर्ष आता या रस्त्याच्या कामासाठी वाट पहावी असेच चित्र दिसत आहे.
बेशिस्त वाहतूक, पार्किंगच्या असुविधामुळे शहरात अनेक ठिकाणी डेंजर स्पॉट तयार झाले आहे. यातुन पोलीस, महानगरपालिका बांधकाम विभाग यांचे साटेलेटे हॉस्पिटलवाल्यांशी आहे की काय असाही प्रश्न सर्वसामान्य नगरकरांना पडत आहे.
आयुर्वेद कॉलेज ते प्रेमदान चौक आदि ठिकाणी एएमटीचा प्रवास सुखद असला तरी या कारणाने दिवसभर गर्दी व वर्दळ कायम असते. तसेच दिल्लीगेट या ठिकाणी कायम पोलिस राहत नसल्याने वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब आहे.
दिल्लीगेट गणपती मंदीरा जवळ अनेक कॉम्प्लेक्स बांधण्यात आले आहे परंतु या कॉम्प्लेक्सला वाहतनळ नसल्याने या भागात रस्त्यावरच मोठी वाहनांची गर्दी जमा होते. तर अनेकदा या ठिकाणी अस्ताव्यस्त लावलेली वाहने नागरीकांनी बाजुला करा असे सांगीतल्यास याकडे या भागातील व्यापारी लक्ष देत नाही यातुन मोठी समास्या वाहतुक दिल्लीगेट भागात निर्माण होताना दिसत आहे. याकडे वाहतुक शाखेने लक्ष द्यावे अशी मागणी अनेकदा संस्थांनी केली आहे. परंतु वाहतुक शाखा याकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसत असल्याने भविष्यात यावर आंदोलन करण्याची वेळ संघटनांवर आली आहे.
