Breaking News

गर्भलिंग चाचणीवरून गुगल, याहुला फटकारले

नवी दिल्ली, दि. 05 - प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचण्यांसंदर्भातील मजकूरावरून सर्वोच्च न्यायालयाने गुगल, याहू, मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांना फटकारले असून सरकारने या सर्व कंपन्यांसोबत चर्चा करावी अशी सूचनाही केली आहे. गुगल, याहू आणि मायक्रोसॉफ्टच्या सर्चइंजिन्सवर प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणीसंदर्भातील माहिती, साधने आणि क्लिनिकबाबतच्या जाहिराती या कंपन्या दाखवित असून त्यासंदर्भात न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करणारी याचिका साबू मॅथ्यू जॉर्ज यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ‘हे सर्च इंजिन्स कायद्याचा भंग करणे सुरूच ठेवणार आहेत का? त्यांना संपूर्णपणे बंद करण्यासाठी काहीच करता येणार नाही का? मध्यस्थाच्या नावाखाली गुगल, मायक्रोसॉफ्ट, याहू अशी बेकायदेशीर कृती करू शकत नाहीत‘, अशा शब्दांत न्यायालयाने या कंपन्यांना सुनावले आहे. तसेच सरकारने 25 जुलैपूर्वी याबाबतचे मत न्यायालयात सादर करावे. तसेच सरकारने तातडीने या सर्व सर्च इंजिन कंपन्या आणि याचिकाकर्त्यांसोबत बैठक घेण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.