जिल्ह्यातील नऊ पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू
कर्जदार शेतकर्यांना पिक विमा बंधनकारक
प्रति हेक्टरी कापसाला 1800, तर सोयाबीनला 440 रूपये हप्ता
बुलडाणा, दि. 09 - खरीप हंगाम 2016 साठी जिल्ह्यातील नऊ पिकांकरिता पंतप्रधान पिक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेनुसार पिकांना मिळालेल्या विमा संरक्षणामुळे नैसर्गिक आपत्ती, किड व रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकर्यांना विमा संरक्षण देता येणार आहे. तसेच पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकर्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधीत राखून कृषि क्षेत्राच्या पतपुरवठ्यात सातत्य राखता येणार आहे. जिल्ह्यातील खरीप ज्वारी, मका, तूर, मुग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ आणि कापूस पिकाला विमा लागू करण्यात आला आहे.जिल्ह्यातील कर्जदार शेतकार्यांना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी पिक विमा बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकर्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडे पट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यासाठी पात्र आहेत. शेतकर्यांवरील विम्याच्या हप्त्याच्या भार कमी करण्यासाठी शेतकर्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी दोन टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के मर्यादीत ठेवण्या आला आहे. योजनेतील विमा उतरविलेल्या पिकांसाठी जोखिम स्तर 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.
तसेच अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांचे उंबरठा उत्पन्न हे मागील 7 वर्षांचे सरासरी उत्पन्न (नैसर्गिक आपत्ती जाहीर झालेली 2 वर्ष वगळून)गुणीले त्या पिकाचा जोखिम स्तर विचारात घेवून निश्चित केले जाणार आहे.
शेतकर्यांनी विमा प्रस्ताव बँकेकडे सादर करण्याची अंतिम तारिख 31 जुलै 2016 पर्यंत आहे.याबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. शेतकर्यांनी अंतिम मुदतीची वाट न बघता जास्तीत जास्त प्रमाणात पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.
