बुलडाणा अर्बनचे सहकारातील योगदान मोलाचे ः फेंग बिंग
चायना कन्स्ट्रक्शन बँकेचे प्रमुख फेंग बिंग यांची बुलडाणा अर्बन संस्थेला भेट...
बुलडाणा, दि. 17 - सहकाराच्या माध्यमातून आर्थिक व सोशल बँकिंग करणारी आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था म्हणून नावलौकीक असलेल्या बुलडाणा अर्बन संस्थेला चीन मधील शियान प्रांतात कार्यरत असलेल्या चायना कन्स्ट्रक्शन बँकेचे प्रमुख फेंग बिंग यांनी गुरुवारी भेट दिली.इंटरनॅशनल को-ऑप. अलायन्स एशिया पॅसिफिक युथ कमेटीचे पहिले भारतीय अध्यक्ष डॉ.सुकेश झंवर यांचा संपूर्ण आशिया खंडातील 27 देशांमधील सहकार क्षेता कार्यरत बँकांशी संबंध आहे. दरम्यान बुलडाणा येथील विशाल बाहेकर यांच्या माध्यमातून डॉ.सुकेश झंवर यांनी चायना कंन्स्ट्रक्शनचे प्रमुख फेंग बिंग यांची भेट घेतली होती. यावेळी डॉ.झंवर यांनी फेंग बिंग यांना भारत व बुलडाणा भेटीचे निमंत्रण दिले होते.
भारताने सहकाराच्या माध्यमातून कशी प्रगती केली आहे याचा अभ्यास करण्यासाठी फेंग बिंग बुलडाणा येथे आले होते. बुलडाणा अर्बन संस्था आशिया खंडात सर्वार्थाने मोठी पतसंस्था आहे. भेटीच्यावेळी डॉ.सुकेश झंवर फेंग बिंग यांचे शाल, पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी डॉ.झंवर यांनी सहकाराच्या माध्यमातून बुलडाणा अर्बन शेतकरी, सभासद, ग्राहक, नागरीकांच्या सर्वांगिण प्रगतीकरीता राबवित असलेल्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.
