Breaking News

मुरुमासाठी नगरेसवकांचा ठिय्या

सांगली, दि. 14 - महापालिकेच्या स्थायी समिती सभेत पुन्हा एकदा पावसाळी मुरुमावरुन वाद पेटला. नगरसेवकांनी प्रशासनाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करीत सभापतींच्या आसनासमोरच ठिय्या मारला. मुरुम टाकण्याचा निर्णय झाल्याशिवाय सभा सुरु करण्यास विरोध केला. त्यामुळे तब्बल तासभर स्थायी समितीची सभा तहकूब करण्यात आली. अखेर आयुक्तांशी चर्चा करुन उपायुक्त सुनील पवार यांनी बुधवारपासून मुरुम टाकण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर सभेचे कामकाज पुन्हा सुरु झाले.
गेल्या महिनाभर पावसाळी मुरुमाचा विषय महापालिकेत गाजत आहे. स्थायी सभेत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. शिवाजी दुर्वे यांनी, गतसभेत मुरुम टाकण्याचा ठराव झाला होता. त्याची अंमलबजावणी का केली नाही? असा सवाल करीत सभापतींच्या आसनासमोर ठाण मांडले. त्यानंतर इतर सदस्यही आसनासमोर आले. त्यांनी ठिय्या मारला. सभापती संतोष पाटील यांनी उपायुक्त, शहर अभियंता, नगरसचिवांनी आयुक्तांशी चर्चा करुन मुरुमाचा निर्णय जाहीर करावा, अन्यथा आमच्या पद्धतीने निर्णय घेऊ, असा दम भरला. तोपर्यंत सभा तहकुब करण्यात आली.
आयुक्त रविंद्र खेबुडकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर तासाभराने पुन्हा सभा सुुरु झाली. यावेळी उपायुक्त पवार यांनी प्रभाग समिती तीनची निविदा कमी दराने आल्याने बुधवारपासून मुरुम टाकण्यासाची कार्यवाही सुरु करीत असल्याचे सांगितले. इतर प्रभाग समितीत कोटेशन मागवून मुरुम उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही दिली. ठकेदारांच्या बिलाचा विषय सभेत चर्चेला आला. उपायुक्तांनी दोन दिवसांत ठेकेदारांची थकीत बिले अदा केली जातील, असे आश्‍वासन दिले.