Breaking News

बेगलुरू बुल्सचा सलग चौथा पराभव

बंगळुरू, दि. 14 - बेगलुरू बुल्सला घरच्या मैदानावर सलग दुसर्‍या परावभवाचा धक्का सहन करावा लागला. मंगळवारी तेलगू टायटन्सने तर बुधवारी जयपूर पिंक पॅथर्सने बंगलुरूचा पराभव केला. या पराभवामुळे बुल्सला सेमिफाइनल खेळण्यासाठी उरलेल्या सर्व सामन्यात चांगली कामगिरी करावी लागेल. संयमी खेळ करत जयपूर पिंक पँथर्सने प्रो कबड्डी लीगच्या बुधवारी झालेल्या सामन्यात यजमान बंगळुरू बुल्सला पराभूत केले. बंगळुरूच्या कांतिरावा स्टेडियमवरील लढतीत पँथर्सने 24-22 असा विजय मिळवला. 
पहिल्या सत्रात बंगळुरूने सुरुवातीच्या क्षणाला 5-1 अशी आघाडी घेऊनही त्यांना जयपूरवर लोण चढवता आला नाही. दीपक कुमार दाहियाने दुसर्‍याच मिनिटाला चढाईत तीन गुणांची कमाई करून बंगळुरूला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सलग दोन गुण कमवत बंगळुरूने सामन्यावर पकड घेतली, परंतु त्यानंतर जयपूरकडून चतुरस्र खेळ झाला. सातव्या मिनिटाला अमित हुडाने बंगळुरूच्या रोहित कुमारची सुपर पकड करून जयपूरला 5-4 असे संघाला सामन्यात परत आणले. सहाव्या मिनिटानंतर बुल्सला गुणासाठी 13 व्या मिनिटाची वाट पाहावी लागली. पँथर्सने 16व्या मिनिटाला यजमानांवर लोण चढवत 13-8 अशी आघाडी घेतली. मध्यंतरापर्यंत त्यांनी 15-9 अशी आघाडी घेतली.
दुसर्‍या सत्रात आक्रमक खेळ करत बंगळुरूने पहिल्याच मिनिटाला रोहितच्या एका चढाईत दोन गुणांची कमाई केली. त्यात 24व्या मिनिटाला आशीष कुमारने दोन गुणांची भर घातली. पुढच्याच मिनिटाला जसवीर सिंगची पकड करून बंगळुरूने सामन्यातील पहिला लोण चढवत 17-16 अशी आघाडी घेतली. त्यानंतर दोन्ही संघांनी सावध खेळ करत एक एक गुण घेत सामन्याचे चित्र हलते ठेवले. 34 व्या मिनिटाला 21-20 असे बुल्स आघाडीवर होते, परंतु त्यांच्याकडून झालेल्या तांत्रिक चुकीमुळे जयपूरला एक गुण देण्यात आला. त्यानंतर कोणतीही जोखीम न पत्करता जयपूरने आघाडी घेत 24-22 असा विजय मिळवला. जयपूूरकडून कर्णधार जसवीर सिंग, अजय कुमार, राजेश नरवाल, यांनी चढाईत चांगली कामगिरी केली तर पकडीत दीपक हुडा यांनी चमक दाखविली. बेगलुरू बुल्सकडून रोहित कुमार याने चढाईत चांगली कामगिरी केली. मोहित-सुरेदर जोडी पुन्हा अपयशी ठरली.