Breaking News

कृष्णा पात्राबाहेर, वारणेच्या पाणी पातळीत वाढ

सांगली, दि. 14 - पुनर्वसु नक्षत्राचे पावसाने गेली पाच दिवस विक्रम केला असून आज सहाव्या दिवशी सूर्याचे दर्शन झाले. तसेच अधून मधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. कृष्णा व वारणा नद्यांचे पाणी धोक्याच्या पातळीवर गेले आहे. त्यामुळे सतर्कतचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात सलग पाच दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे सांगलीत कृष्णेचे पाणी पात्राबाहेर पडले. शहरातील अनेक नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून, 20 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. सांगली, मिरजेत काल मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्याच्या बहुतांश भागातील पावसाचा जोर कमी झाल्याने सांगलीत कृष्णेची पातळी 32.9 फुटांवर स्थिरावली. मात्र, वारणेची पाणी पातळी चढतच राहिली. शिराळ्यात मोरणा नदीसही पूर आला आहे.
वारणा नदीपाठोपाठ सांगलीत कृष्णा नदीही आता पात्राबाहेर पडल्याने नदीकाठी सतर्कतचा इशारा देण्यात आला आहे. सांगली शहरातील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, दत्तनगर, कर्नाळ रस्ता परिसर याठिकाणी नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. 20 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले असून, अन्य लोकांनाही नदीपातळी कमी होईपर्यंत स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत. सांगली व सांगलीवाडीतील स्मशानभूमीही पाण्याखाली गेली आहे. काल रात्रीपर्यंत सांगली व मिरजेत मुसळधार पाऊस सुरुच राहिल्याने शहराच्या सखल भागासह सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले होते.
विस्तारीत भागातील अनेक नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. रस्ते, चौक पाण्याने वेढले गेल्याने दिवसभर सांगलीत वाहतूक विस्कळीत झाली होती.
जिल्ह्यात खानापूर, आटपाडी, जत तालुक्यात पावसाने उघडीप दिली असून, अन्य तालुक्यांतील पावसाचा जोरही कमी झाला आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाणही आता घटले आहे. त्यामुळे दिवसभरात कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली नाही.