Breaking News

दरिबडचीत दाम्पत्याचा डेंग्युने मृत्यू

सांगली, दि. 23 - (ता. जत) येथील बनसिद्ध काशिनाथ दाते (45) व त्यांची पत्नी सुनीता बनसिद्ध दाते (35) या दाम्पत्याचा डेंग्यूसदृश तापाने पांढर्‍या पेशी कमी होऊन एकाच दिवशी दोन तासाच्या फरकाने मृत्यू झाला. घरात अठराविश्‍व दारिद्रय असलेल्या भूमिहीन, मोलमजुरी करणार्‍या या दाम्पत्याच्या मृत्यूने सर्वांना चटका लावला आहे. यामुळे त्यांच्या पश्‍चात असलेला मुलगा व दोन मुली मात्र आई-बापाविना पोरके झाले आहेत.
गेल्या 15 दिवसांपूर्वी हे पती-पत्नी, मुले, आई, भाऊ, भावजय यांच्यासमवेत आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी, श्रीशैल येथे देवदर्शनासाठी गेले होते. तेथून आल्यानंतर पत्नी सुनीता आजारी होती. त्यांच्या उपचारासाठी बनसिद्ध घरी थांबून होते. त्यांना ताप येतच होता. किरकोळ उपचार करुन ते अंगावर दुखणे काढत होते. अचानक प्रकृती बिघडल्याने हे दोघे पती-पत्नी जत येथील डॉ. पवार यांच्या रुग्णालयामध्ये दाखल झाले होेते. तेथे औषधोपचार सुरु झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. पांढर्‍या पेशी कमी झाल्याने बनसिद्ध कोमात गेले. दुपारी 12.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईक मृतदेह घेऊन गावी आले.
दरम्यान, रुग्णालयात दुसर्‍या वॉर्डामध्ये असलेल्या सुनीता यांना पतीच्या निधनाची बातमी दिली नव्हती. त्यांच्याही पांढर्‍या पेशी कमी झाल्याने अशक्तपणा वाढला होता. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना सांगलीला उपचारास जाताना रुग्णालयासमोरच त्यांचेही दीड तासाच्या अंतराने दुपारी दोन वाजता निधन झाले. रात्री उशिरा दोघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार केले.