Breaking News

वीस महिन्यांच्या कारकिर्दीत फडणवीस सरकारमधील वीस मंत्री घोटाळयात!

पुणे, दि. 23 - केवळ 20 महिन्यांच्या कारकिर्दीत राज्यमंत्रीमंडळातील 20 मंत्रयांची गैरव्यवहारांची प्रकरणे बाहेर आली आहेत.आजवर कोणतेही सरकार एवढया लवकर बदनाम झाले नव्हते. बाकी विषयात नाही परंतू याबाबत मात्र सरकार गतीमान आहे अशी खरमरीत टीका करतानाच भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घेउन त्यांना घरी पाठवा अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत केली. या मंत्र्यांवरील आरोपांची उच्च न्यायालयाचया विदयमान न्यायमुर्तींचा आयोग नेमून चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली.
 राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात विरोधी पक्षांनी नियम 293अन्वये विधानसभेत चर्चा उपस्थित केली होती.चर्चेला सुरूवात करताना विरोधी पक्षनेतेराधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर तुफान टीका केली.मंत्रीमंडळात आधीच भ्रष्ट मंत्रयांचा भरणा असताना नुकत्याच झालेल्या विस्तारातही गैरव्यवहाराचे गंभीर आरोप असणार्‍या लोकांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला. भ्रष्टाचारा बाबतझीरो टॉलरन्सची भाषा मुख्यमंत्री नेहमी करत असतात.प्रत्यक्षात मात्र त्यांचे धोरण झीरो कॉग्निझन्स असेच असून राज्याची अवस्था अंधेर नगरी चौपट राजा अशी झाली असल्याची टीका विखे-पाटील यांनी केली.मंत्रीमंडळातील कलंकित मंत्रयांची तपशीलवार प्रकरणे मांडताना विखे-पाटील यींन अवघ्या वीस महिन्यात वीस मंत्री विविध प्रकरणात अडकले असतील तर पाच वर्षांत या सरकारची परिस्थिती काय असेल असा उपरोधिक सवाल केला.
रविंद्र चव्हाण यांनी एका जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्रयांच्या उपस्थितीत दलित समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केले तरीही त्यांना राज्यमंत्रीपदाची बक्षिसी देण्यात आली.उत्तर प्रदेशात भाजपा उपाध्यक्षांनी मायावती यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले.येथे मात्र रविंद्र चव्हाण यांना बक्षीसी देण्यात आलयाची टीका त्यांनी केली.जयकुमार रावल यांचयावर सोळा कोटींच्या बेकायदा कर्ज वाटपाचा आरोप असून हायकोर्टाने नेमलेल्या विशेष चौकशी पथकाने दाखल केलेल्या आरोपपत्रात त्यांचे नाव आहे.तरीही त्यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला.पन्नास कोटींच्या कर्जवाटपात सीबीआयने दोषारोपपत्र ठेवलेले संभाजी पाटील निलंगेकर यांनी उजळ माथ्याने कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.रेनकोट घोटाळयात विष्णू सावरा यांचे तर आरे कॉलनीतल्या भूखंड घोटाळयात रविंद्र वायकर यांचे नाव आले आहे.पंकजा मुंडे यांच्या खात्याने घरपोच पोषण आहार योजनेत दिलेले कंत्राट उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केले आहे.याशिवाय गिरीश महाजन,दिवाकर रावते,दीपक सावंत,विनोद तावडे,रणजित पाटील आदी मंत्रयांच्या संदर्भातही गंभीर आरोप असून वीस महिन्यातच सरकार विश्‍वासार्हता गमावून बसले आहे.मंत्रयांच्या भ्रष्टाचाराच्या पुराव्याचे प्रदर्शन काँग्रेस कार्यालयात नुकतेच भरविण्यात आले होते.हीच गती राहिली तर पुढच्या वेळेस प्रदर्शन भरविण्यास वानखेडे स्टेडियम लागेल असा टोला विखे-पाटील यांनी लगावला.
त्याचवेळी आरोपांमुळे एकनाथ खडसेंचा राजीनामा घेण्यात येतो पण इतरांना माफी का असा सवालही त्यांनी केला.
राम तेरी गंगा मैली हो गयी
राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनीही सरकारमधील भ्रष्ट मंत्रयांवर कारवाईची मागणी करताना प्रखर टीका केली.मंत्रीमंडळात कोणाला घ्यायचे किंवा नाही हा पूर्णतः मुख्यमंत्रयाचा अधिकार असला तरी किमान घोटाळेबाज लोकांचा तरी मंत्रीमंडळात समावेश करणे टाळायला हवे होते.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ना खाउंगा ना खाने दूंगा अशी घोषणा केली होती.त्यामुळे केंद्रात व राज्यात लोकांनी भाजपाला निवडून दिले.पण एवढया कमी कालावधीत सरकार बदनाम झाल्याचे चित्र पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे.स्वच्छ प्रतिमेचा पक्ष म्हणून भाजपाची प्रतिमा होती ती पूर्णतः डागाळल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.विरोधी पक्षात असताना ज्या राज्य सहकारी बँकेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप केले त्याच संचालक मंडळातील पांडुरंग फुंडकर यांना मंत्री कसे काय करण्यात आले असा सवालही करताना दुस-या वर्षीच नव्या घराची साफसफाई करण्याची वेळ आल्याची टीका त्यांनी केली.
मुखयमंत्रयांची प्रतिमा स्वच्छ असली तरी मंत्रयांवरील भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे राम तेरी गंगा मैली हो गयी असे म्हणण्याची वेळ आली असल्याचा टोला त्यांनी लगावला.