Breaking News

महापौरांच्या हस्ते सहा हजार वह्यांचे वाटप

। कार्यारंभीच महापौर सौ.सुरेखा कदम यांनी पहिला षटकार मारला : भगवान फुलसौंदर  

अहमदनगर (प्रतिनिधी) । 09 - शिवसेनेच्या नूतन महापौर सौ. सुरेखाताई कदम यांनी सत्काराप्रीत्यर्थ शालेय साहित्य भेट म्हणून देण्याचे आवाहन करुन, आपल्या कार्यारंभीच पहिला षटकार मारला, असे प्रतिपादन प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले. 

महापौर सौ. कदम यांच्या आवाहनास प्रतिसाद देत येथील साईराम ट्रस्टतर्फे अंकुर लॉनमध्ये 1 लाख 80 हजार रुपये किंमतीच्या 6 हजार वह्यांचे वाटप करण्यात आले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
व्यासपीठावर सेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, सेनेचे युवानेते विक्रम राठोड, नगरसेवक दत्तात्रय कावरे, योगीराज गाडे, भिंगार बॅँकेचे संचालक संदेश झोडगे, संतोष गेनाप्पा, नितीन बारस्कर, पहिल्या महिला महापौर शीलाताई शिंदे, हेमाताई खैरे उपस्थित होते. दत्तात्रय लकशेट्टी यांनी प्रास्ताविक करताना साईराम ट्रस्टच्या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, कदम यांनी सत्काराप्रीत्यर्थ शालेय साहित्य भेट देण्याचे आवाहन केले. त्यावरुन राष्ट्रीय पाठशाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्याच्या समारंभाचे आयोजन केले आहे. यासाठी ट्रस्टमधील सर्वांनी आर्थिक योगदान दिले आहे. ट्रस्टचे उपाध्यक्ष अँड़ अशोक गदादे, सेक्रेटरी बाळासाहेब पवार, संजय गुंड यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
योगीराज गाडे यांनी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी अत्यंत गरीबीमधून मार्ग काढत राष्ट्रपतीपदापर्यंत मजल मारली. त्यांचे जीवनकार्य विद्यार्थ्यांना सदैव प्रेरणा देत राहील. महापौर सौ.कदम यांनी सत्काराप्रीत्यर्थ वह्यांची भेट देण्याचे आवाहन करुन आपले वेगळेपण दाखवून दिले आहे. सेनेसमेर कायम विकासाचे ध्येय असते, हेच यातून स्पष्ट झाले आहे. विक्रम राठोड यांनी वह्या वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोलाची मदत करणारा ठरणार आहे. दत्तात्रय कावरे यांनी साईराम ट्रस्टने गरीब व होतकरी विद्यार्थ्यांना वह्या उपलब्ध करुन देऊन त्यांच्या शिक्षणास मदत केल्याब्द्दल समाधान व्यक्त केले. संभाजी कदम यांनी शिवसेना विद्यार्थ्यांना स्पर्धेत उतरविण्यासाठी तसेच खेळामध्ये पुढे जाण्यासाठी सदैव मदत करेल, असे त्यांनी सांगितले.