अधिकारी हा शेतकर्यांचा मित्र ही भावना निर्माण व्हायला हवी
। कृषी आयुक्त विकास देशमुख यांचे प्रतिपादन
अहमदनगर, दि. 09 - कृषी जनजागृती सप्ताहानिमित्त तळागाळातील शेतकर्यांशी संवाद साधून शेतकर्यांजवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. नवनवीन तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहोचवले जाईल. शेतकर्यांमघ्ये अधिकारी आपला मित्र आहे, याची भावना निर्माण व्हायला हवी, असे प्रतिपादन कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी केले.कृषी जनजागृती सप्ताहानिमित्त निमगाव घाणा येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात श्री. देशमुख बोलत होते. यावेळी प्र. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब बर्हाटे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे, सरपंच राणी पंडित, उपसरपंच भानुदास लाळगे, चेअरमन धोंडिभाऊ कोकरे, संजय पाटील आदी उपस्थित होते.
श्री. देशमुख पुढे म्हणाले की, 2022 पर्यंत शेतकर्यांचे उत्पन्न डबल व्हायला हवे, हे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. हे साकार करायचे असेल, तर पाण्याचा थेंब ना थेंब अडवला पाहिजे. जमिनीत ओलावा निर्माण व्हायला हवा. जलयुक्त शिवारसारखी महत्वांकाक्षी योजना राबविल्यामुळे पाणी अडवण्यास व जिरवण्यास मोठी मदत होत आहे, असे ते म्हणाले. बर्हाटे म्हणाले की, शेतकर्यांचा आत्मविश्वास अधिकार्यांना प्रेरणा देणारा आहे. हे एक नवचैतन्य आहे. कृषी सप्ताहानिमित्त योजनेच्या माध्यमातून कृषी विभाग शेतकर्यांशी जोडला जाईल. ही एक चळवळ आहे, असे ते म्हणाले.
याप्रसंगी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे यांनी शेतकर्यांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले.
