Breaking News

निवडूंगे पाठोपाठ वाडेगव्हाण येथेही दरोडेखोरांचा धुमाकूळ

। दरोडेखोरांनी घेतला एका महिलेसह दोघांचा बळी । पाथर्डी व सुपा परिसरात घबराटीचे वातावरण । दरोडा नियंत्रण गस्त पथक नेमावे

 अहमदनगर (अशोक झोटिंग) (प्रतिनिधी) । 09 -  पाथर्डी तालुक्यातील निवडूंगे पाठोपाठ पारनेर परिसरातील वाडेगव्हाण जवळील ताणवडे मळा येथेही दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. दरोडेखोराच्या मारहाणीत वृध्द महिला पार्वतीबाई ज्ञानदेव तानवडे (वय 70) ठार झाली. जिल्ह्यात दरोडेखोराच्या मारहाणीत दोघांचा बळी गेला. या घटनांमुळे पाथर्डी व पारनेर तालुक्यात नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी तपासासाठी सर्व प्रकारे प्रयत्न केले. मात्र, दरोडेखोराचा तपास लागला नाही. परप्रांतीय दरोडेखोर असावेत, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
वाडेगव्हाण जवळील ताणवडे मळा येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. घरातील वृध्द महिलेला बेदम मारहाण करुन घरातील लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेत जखमी झालेल्या वृध्द महिलेचे निधन झाले. या प्रकरणी सुधाकर ज्ञानदेव तानवडे यांनी फिर्याद दिली आहे. सुपा पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
तानवडे वस्ती येथे पहाटेच्या सुमारास दरोडा पडला. यात वृध्देला बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती सुपा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच ठसे तज्ञ व श्‍वानाला बोलविण्यात आले. तज्ञांनी पुरावेजन्य  वस्तु व ठसे घेतले. श्‍वानाने रस्त्यापर्यंत माग काढला.
या घटनेची माहिती पोलिस अधिक्षक डॉ.सौरभ त्रिपाठी यांना देण्यात आली. ते दुपारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन मिळालेल्या माहितीवरुन आरोपींच्या तपासासाठी वेगवेगळे पथक रवाना केले आहेत. वृध्द महिलेचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोनि.सोमवंशी तसेच गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानेही दरोडेखोराचा तपास सुरु केला आहे.
पाथर्डी तालुक्यातील निवडूंगे परिसरात दोन दिवसापुर्वी दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून पाच ते सहा ठिकाणी चोरी केली. यावेळी झालेल्या मारहाणीत प्रदिप मरकड (वय 22) हा युवक गंभीर जखमी झाला होता. त्याला औषधोपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले होते. औषधोपचार सुरु असतांनाच त्याचे निधन झाले. या दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यातील अनेक भागात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या दोन ते तीन महिन्यापासून जिल्ह्यातील पोलिस ठाण्यातंर्गत असलेल्या भागात चोरी, घरफोडी त्याबरोबरच रस्ता लूट, मंगळसुत्र पळविणे, तसेच काही तालुक्यात दरोड्याच्या घटना घडत आहेत. मात्र, पोलिसांना या कोणत्याच घटनेतील आरोपी सापडत नाही. त्यामुळे नागरिक भयभीत वातावरणात वावरत आहेत. जिल्ह्यातील व्यापारीही असुरक्षित आहे. व्यापार्‍यांचे पैसे पळविण्याच्या घटना ही वाढल्या आहेत. वारंवार आदेश देऊनही पोलिसांकडून गंभीर  गुन्ह्यातील आरोपी पकडण्यात कुचराई होत आहे.
घरफोडी, चोरी तसेच दरोड्यातील आरोपी पकडण्यासाठी पोलिस अधिक्षक यांनी पोलिस खात्यात दरोडेखोरांची माहिती असलेल्या जुन्या, जाणकार, अभ्यासु पोलिसांचे विशेष पथक  नेमल्यास अनेक गुन्हेगार जेरबंद होण्याची शक्यता आहे. पुर्वी शहरात दरोडेग्रस्त नियंत्रण पथक कार्यरत होते. जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात पडलेल्या दरोड्यातील आरोपींची वेगवेगळ्या स्तरावरुन माहिती त्यांना जेरबंद केले जात होते. मात्र, सध्या कार्यरत असलेली गुन्हे अन्वेषण शाखा फक्त नावापुरतीच उरली आहे. गुन्हे अन्वेषण शाखा सध्या घरफोड्या, चोरी, दरोडे, रस्ता लूट यातील गुन्ह्याचा तपास करण्याऐवजी जिल्ह्यातील अवैध दारु, जुगार, मटका यावरच धाडी टाकतांना दिसत आहेत.
दारु, मटका, जुगार यावर धाडी टाकण्याचे काम स्थानिक पोलिस ठाण्याची कर्मचारीही करु शकतात. मात्र, या छाप्यामध्ये कार्यवाही करण्यात गुन्हे अन्वेषण शाखा धन्यता मानते. यामागील कारणेमिमासंसा शोधण्याची गरज आहे. पोलिस अधिक्षक यांनी आगामी शिर्डीतील दत्ता पोर्णिमा उत्सवाच्या पार्श्‍वभुमीवर दरोडा नियंत्रण पथक तैनात करावे, जिल्ह्यात परप्रांतातून येणार्‍या भाविकांची संख्या मोठी असते. परप्रांतातून येणारे भाविक रात्रीच्या सुमारास प्रवास करुन शिर्डी व शिंगणापूर येथे येतात. त्यांना अडवून लूट होण्याच्या घटना या काळात वाढतात. पुर्वी याच कालावधीत रस्ता लुटीच्या घटना घडतात. परप्रांतीय गुन्हेगाराप्रमाणेच स्थानिक गुन्हेगारांच्या टोळ्याही कार्यरत होतात. यांच्या बंदोबस्तासाठी दरोडा नियंत्रण गस्तीपथक नेमण्याची गरज आहे.