Breaking News

आत्महत्याग्रस्त कुटुंबांना घरपोच दिले खते व औषधी

बुलडाणा, दि. 11 - आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांना आधार देण्याचा प्रयत्न विनायक सिड्स चे संचालक सुनील देशमुख यांनी वाढदिवसा निमित्त केला आहे. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची वाताहत होते. समाजाने अशा कुटुंबांना आधार देण्याची आज नितांत गरज आहे. आणि हीच गरज ओळखून सुनील देशमुख यांनी 8 जुलै रोजी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबाच्या दारावर पोहचून त्यांना खते व फवारणीचे औषध घरपोच देऊन त्यांना आधार देण्याचे काम केले.
      शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाना आधार देण्यासाठी सुनील देशमुख यांनी हा स्तुत्य उपक्रम राबविला. मढ येथील स्व.लताबाई गोपीनाथ सिहिरेे, धामणगाव येथील मुकूंद देवराव सपकाळ, सातगाव येथील गजानन संतोषराव शिंदे, टाकळी येथील अण्णा माणिकराव बोराडे, झरी येथील संतोष पुंजाजी सपकाळ व प्रभाकर त्र्यंबक चव्हाण आदी आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना खत व फवारणीचे औषध देऊन त्यांच्या खर्चाचा वाटा उचलुन कुटुंबियांना आधार देण्याचे काम केले. मढ येथील सिहिरे कुटुंबियांना आ.हर्षवर्धन सपकाळ यांच्याहस्ते खते व औषधी वाटप करुन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी दिनकरराव ढोमणे, सुरेश देठे, नसिम बेग, नंदु शिंदे, समाधान पायघन, जितेंद्र पायघन, साहेबराव पाटील, निलेश देठे, सरपंच अभिमन्यु जाधव, गजानन गायकवाड, संतोष पाटील, सुरेश कवडे, सुभाष जाधव यांचेसह अनेकांची उपस्थिती होती. इतरांनी अशा उपक्रमांच्या माध्यमातून शेतक-यांना आधार देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी आ.सपकाळ यांनी केले.