जबरी अत्याचार करुन मुलीचा खून
। कोपर्डीतील घटना । आरोपी जेरबंद । घटनेच्या निषेधार्थ कर्जतमध्ये बंद, रस्ता रोको
अहमदनगर (प्रतिनिधी) । 15 - कर्जत तालुक्यातील कोपर्डी शिवारात 15 वर्षाच्या मुलीवर जबरीने लैगिंग अत्याचार करुन झालेल्या घटनेचा तिने बोभाटा करु नये यासाठी तिला जबर मारहाण करुन तिचा गळा दाबून निघृण खून केल्याची घटना घडली. या घटनेप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात आरोपी जितेंद्र उर्फ पप्पु बाबुलाल शिंदे याच्या विरुध्द भादवि.कलम 376, 302, तसेच बाल लैगिंग अत्याचर कायदा कलम 4 अन्वये गुन्हा दाखल केला असून घटनेनंतर कर्जत व श्रीगोंदा पोलिसांनी तपास करुन आरोपी जेरबंद केला आहे.लैगिग अत्याचाराची घटना बुधवारी सायंकाळी 7 च्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे कर्जत व श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली. गेल्या अनेक दिवसापासून दोन्ही तालुक्यात अशा घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे मुलींच्या पालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहेे. मयत मुलीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लंगारे,पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे, यांनी घटनास्थळी भेट दिली. गुरुवारी दुपारी अधिक्षक डॉ.सौरभ त्रिपाठी यांनीही भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर आरोपी जेरबंद करण्यात आला.
दरम्यान, कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील घटनेमुळे पुन्हा या समाजवादी म्हणवणार्या महाराष्ट्राला विचार करण्यास लावणारी व काळिमा फासणारी घटना घडली. याचे तीव्र पडसाद जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या ना. प्रा. राम शिंदे यांच्या मतदार संघामध्ये सदर घटना घडल्यामुळे याचे विधानभवनामध्ये तीव्र पडसाद उमटले पाहिजेत. जेणेकरून असे कृत्य करताना आरोपीच्या अंगावरील रोम उभे राहिले पाहिजेत. सदर मुलगी ही अल्पवयीन असून इयत्ता नववीमध्ये शिकत होती. ती ग्रामीण भागातील आहे. ग्रामीण भागातील मुलीना शिक्षणासाठी पायी पाच ते सहा किलोमीटर जावे लागते. अशावेळी रस्त्याने जाताना एकट्यादुकट्या मुलीला गाठून अत्याचार करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा गोष्टीचा वेळीच बंदोबस्त झाला पाहिजे. या सरकारची ही नैतिक जबाबदारी आहे. आरोपी राजेंद्र शिंदे व इतर चार जण यांनी अल्पवयीन मुलीवर शाळेत जात असताना तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केला अशा नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी असे दक्षिण जिल्हाध्यक्ष नितीन भापकर म्हणाले.
