Breaking News

अनुप कुमारमुळे यू मुंबाचा विजय

पाटणा, दि. 09 - प्रो कबड्डी लीगमध्ये शुक्रवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात यू मुंबाने बेगलुरू बुल्सला 1 गुणांचे पराभव करीत गुणतालिकेत दुसर्‍या  क्रमांकावर झेप घेतली. भारताचा कर्णधार अनुप कुमारने अनुभवाला साजेसा खेळ करत प्रो कबड्डी लीग स्पर्धेत यू मुंबाला बंगळुरू बुल्सविरुद्ध 24-23 असा  विजय मिळवून दिला. मध्यंतराला पिछाडीवर असणार्‍या मुंबईला अनुपच्या झंझावाती चढाया आणि चतुर नेतृत्वगुणांमुळे तारले. अन्य लढतीत प्रचंड पाठिंबा  असलेल्या पाटणा पायरेट्सने बंगाल वॉरियर्सवर 35-21 असा विजय मिळवला.
बंगळुरूच्या पवन शेहरावत व सुरिंदर नाडा यांनी संघाला 10-7 अशी आघाडी मिळवून दिली. बंगळुरूच्या रोहित कुमारच्या यशस्वी चढाईमुळे यू मुंबावर लोण  बसला. यू मुंबाच्या ढिसाळ खेळामुळे बंगळुरूने मध्यंतराला 14-8 अशी आघाडी घेतली. मग अनुपने सातत्याने यशस्वी चढाया करत पिछाडी भरून काढली.  अनुपच्या दमदार चढाईच्या बळावर मुंबईने बंगळुरूवर लोण चढवत 20-19 अशी सरशी साधली. शेवटच्या क्षणांमध्ये मुंबईच्या सुरजीतने बंगळुरूच्या रोहितची  पकड केली. अनुपने चढायांद्वारे सुपर टेन पूर्ण करीत 11 गुण कमावत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
अन्य लढतीत पाटण्याने मध्यंतराला 17-12 अशी आघाडी घेतली. विश्रांतीनंतर पाटण्याचा कर्णधार धर्मराज चेरलाथनने  चार सुपर पकडींद्वारे 9 गुण मिळवले.  प्रदीप नरवालने 10, तर राजेश मोंडलने 5 गुण मिळवत पाटण्याचा विजय साकारला. पाटणा पायरेट्सने सलग पाचवा विजय साकार केला.