चीनमध्ये आलेल्या पुरामुळे शेकडो मृत्युमुखी
शांघाय, दि. 05 - मध्य व दक्षिण चीनमध्ये आलेल्या पुरामध्ये सुमारे 100 नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. पुरामुळे सुमारे 15 लाख हेक्टर शेतजमिनीवरील पीके उध्वस्त झाली असून यामुळे 20 अब्ज युआनपेक्षाही (3 अब्ज डॉलर्स) जास्त आर्थिक नुकसान झाल्याचे येथील सरकारने म्हटले आहे. पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या प्रांतांपैकी एक असलेल्या आन्हुई प्रांतास चीनचे प्रधानमंत्री ली केक्विआंग यांनी भेट देऊन मदतकार्याची पाहणी केली. याचबरोबर ली यांनी यानंतर हुनान प्रांतासही भेट दिली. चीनमध्ये मुसळधार पावसाने देशातील किमान 11 प्रांतांना फटका बसला असून त्यामध्ये किमान 93 मृत्युमुखी, तर 19 बेपत्ता झाले असल्याचे निष्पन्न झाले आहे. मृतांचा आकडा यापेक्षा कितीतरी अधिक असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
