Breaking News

जय पार्वतीमाता एज्युकेशनमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तके देवुन स्वागत

। महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते पुस्तक वाटप 

अहमदनगर, दि. 17 - शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविणारे उपक्रम शाळेने आयोजित करणे गरजेचे आहे. त्यामुळे अभ्यासाबद्दलची मुलांची गोडी वाढेल. ही गोडी वाढल्यास त्याचा चांगला परिणाम दिसून येईल. जय पार्वतीमाता ज्युनियर कॉलेजमधील 11वीतील विद्यार्थ्यांना पुस्तक देऊन स्वागत करण्याचा हा उपक्रम प्रशंससनीय आहे, असे प्रतिपादन महापौर सुरेखा कदम यांनी केले.
माळीवाडा येथील जय पार्वतीमाता ज्युनियर कॉलेजमधील 11वीतील विद्यार्थ्यांचे पुस्तक महापौर कदम यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी सचिव नंदकुमार गोरे, नगरसेवक दत्ता कावरे, हेमाली पालवे, श्याम घोलप, प्राचार्या मृणाली गोरे, रजिया इनामदार आदी उपस्थित होते.
कदम पुढे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व मेहनत हे गुण अंगी बाणवण्याबरोबरच अंगी लीनता असावी. अभ्यासामध्ये सातत्य ठेवावे. करिअरचा विचार करता योग्य ध्येय निश्‍चित करून आतापासूनच त्या दृष्टीेने वाटचाल करावी. आई-वडिल व गुरूंचा आदर करावा. अपयशाने खचून जाऊ नका व यशाने हुरळून जाऊ नका, असे ते म्हणाले.
सचिव नंदकुमार गोरे म्हणाले की, कॉलेजचे हे सातवे वर्ष आहे. अतिशय खडतर परिस्थितीत आपण हे कॉलेज सुरू केले. छोटेसे रोपटे लावले होते. त्याचे आता झाडात रूपांतर होत आहे. या कामी अनेकांचे सहकार्य लाभले आहे. आमचा आत्मविश्‍वास मोठा असून, जिद्दीने पुढे जात आहोत. कितीही अडचणी आल्या तरी काम करीत राहिल्यास यश मिळतेच. सात वर्षांच्या काळात या विद्यालयातील विद्यार्थी विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळवित आहेत, असे ते म्हणाले. यावेळी कावरे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रजिया इनामदार यांनी केले, तर सोनाली कुलथे यांनी आभार मानले.