Breaking News

जनरल मोटर्सने एक अब्ज डॉलरची भारतातील गुंतवणूक थांबवली

नवी दिल्ली, दि. 23 - जनरल मोटर्स या प्रख्यात कार उत्पादक कंपनीने भारतातील एक अब्ज डॉलरची प्रस्तावित गुंतवणूक अनिश्‍चित काळासाठी स्थगित केली आहे. हा भारतीय उद्योग क्षेत्राला मोठा धक्का आहे. देशांतर्गत विक्री निराशाजनक राहिल्याने जनरल मोटर्सने गेल्या वर्षी भारतात मोठे निर्यात केंद्र बनवण्याचे जाहीर केले होते. हलोल हा गुजरातेतील प्रकल्प बंद करताना जीएमने ही घोषणा केली होती. सध्या त्यांचा पुण्याजवळचा तळेगाव येथील प्रकल्पच फक्त सुरू आहे.
गुंतवणुकीचा निर्णय लांबणीवर टाकण्याचे कारण असे सांगितले जाते की, कंपनीला भारतात फक्त निर्यात केंद्र म्हणूनच उभारायचे नाही तर नफा मिळवून देणारा व्यवसायही हवा आहे. भारतातील उभरत्या जागतिक बाजारपेठ प्लॅटफॉर्मच्या (जीईएम) टेकूवर वाहने बनवण्याची जीएमची योजना होती. भारत, चीन आणि ब्राझिल या सामायिक बाजारपेठेतील गरजा भागवणारी एन्ट्री लेव्हलची वाहने बनवण्यासाठी जीईएम हा प्लॅटफॉर्म विशेषकरून तयार करण्यात आला होता. परंतु भारतातील विक्री आणि कामगिरी पाहून जीएमने हे काम लांबणीवरच टाकले आहे.