Breaking News

भारताचा धावांचा डोंगर; कोहलीचे द्विशतक

नॉर्थ साउंड, सेंट पीटर्स (अँटिगा), दि. 23 -  पहिल्या कसोटीत भारताची चांगली सुरूवात झाली आहे. कोहलीचे पहिले द्विशतक फिरकी गोलंदाज  अश्‍विनच्या शतकामुळे भारताने वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 566 धावांचा डोंगर उभा केला. भारताने 8 बाद 566 धावांवर डाव घोषित केल्यानंतर दुसर्‍या दिवसअखेर वेस्ट इंडीजची अवस्था 1 बाद 31 अशी झाली होती. 
फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर प्रथम फलंदाजीच्या संधीचे विराटने सोने केले. भारताने पहिल्या कसोटीच्या दुसर्‍या दिवशी उपाहारापर्यंत विराटने आपले पहिले द्विशतक पूर्ण केले. परदेशात द्विशतक करणारा विराट हा एकमेव भारतीय कर्णधार ठरला आहे. कोणत्याही भारतीय कर्णधाराने परदेशात द्विशतक केले नव्हते, जे विराट कोहलीने साध्य करून दाखविले. विराटने कालचा डाव जणू पुढे चालू केला. कोणतीही जोखीम न उचलतासुद्धा तो तगडे फटके मारत होता. अश्‍विनही मुरलेल्या फलंदाजाप्रमाणे खेळू लागला. दोघांच्या भागीदारीचे दीडशतक फलकावर लागले. उपाहाराअगोदर विराटचे द्विशतक पूर्ण होते का हे दस्तूरखुद्द सर व्हिवियन रिचर्डस बघत होते. द्विशतकानंतर कोहलीने खेळपट्टीचे चुंबन घेतले आणि मग बॅट वर करून मानवंदना स्वीकारली चेसला एकेरी धाव काढून विराटने द्विशतक झोकात साजरे केले. गुणवत्तेला कष्ट आणि ध्येयाची साथ मिळाली की असा खेळाडू तयार होतो,“ असे रिचर्डस उभे राहून टाळ्या वाजवताना म्हणाले. अश्‍विनने सुरेख साथ देत शतक झळकाविले. अश्‍विनने 113 धावांची खेळी केली.