Breaking News

ब्राह्मणी भुल-भुल्लैया!

हिंदू बहुजन समाज आता आधुनिक, वैज्ञानिक जीवन शैली स्विकारण्यास उत्सुक आहे. तो शिक्षणात येताच त्याची नेणीवेत गेलेली वैज्ञानिक संस्कृती आता जागी झाली आहे. तो अवैज्ञानिक विचार आणि विचारधारा भिरकावून देण्याच्या क्षमतेत आल्याबरोबर ब्राह्मणी संस्कृतीने हिंदू बहुजनांना सत्तेचा लॉलीपॉप दाखवला आहे. अर्थात राजकीय पक्ष म्हणून जर पाहिले तर सध्या भारतीय जनता पक्ष नावाचा राजकीय पक्ष त्यांना हे अमिष दाखवतो आहे. परंतु याची सुरुवात काँग्रसनेच केली आहे. काँग्रेसची राज्य करण्याची पध्दती ही प्रथम सार्वभौमसत्ता ही ब्राह्मणांच्या हाती राखायची व इतर निर्णयसत्ता नसलेली पदे बहुजनांकडे सोपविण्याची चलाखी त्यांनी स्विकारली. देशात राजकीय सत्ता सर्वप्रथम महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर समाजाकडे देवून हा पायंडा सुरु झाला. पंडीत नेहरुंनी महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळ चालविणार्‍या मराठ्यांना राज्याची सत्ता सोपविण्याचे आश्‍वासन देवून सत्यशोधक चळवळीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करुन घेतले. यानंतर महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीतील अग्रणी समजले जाणारे मराठे राजकीय सत्तेतून ब्राह्मणांच्या कहेत गेले. त्यानंतर हा पायंडा इतर अनेक राज्यातील जातींनीही पाडून घेतला. आता देशात उत्तराखंड सारखे आणि पश्‍चिम बंगाल हा प्रांत सोडला तर कोणत्याही राज्यात ब्राह्मणी समुदाय सत्ताधारी नाही. बहुजनांची एवढी विशालकाय राजकीय ताकद असतानाही काँग्रेसने केंद्रिय सत्तेत ब्राह्मणांना अग्रणी ठेवले. तर राज्यांची सत्ता त्या-त्या राज्यात रुलिंग कास्ट निर्माण करुन निर्णय सत्तेचा अधिकार मात्र ब्राह्मणी पक्ष प्रमुखांकडेच ठेवला. काँग्रेसच्या या रणनितीमुळेच ब्राह्मणी विचारांच्या संघटना डोईजड झाल्याचे चित्र आज देशात दिसू लागले आहे. परंतु भारतीय जनता पक्ष काँग्रेसची हीच रणनिती अधिक आक्रमकपणे वापरताना दिसते आहे. अर्थात ही रणनिती वापरण्यात भाजप पुढे दिसत आहे. अनेक राज्यात त्यांनी हे प्रयोग करण्याचा प्रयत्न करुन पाहिला, परंतु थेट राजकीय सत्ता बहुमतात मिळविणे त्यांना अवघड झाले आहे. महाराष्ट्रात भाजप-सेना युती सत्तेत असली तरी भाजपच्या रणनितीला बहुमत पूर्ण मिळवता आले नाही, हे सिध्द होते. हिंदू बहुजनांची ही शक्ती केवळ संख्याबळ प्रदर्शित करित नाही, तर त्यांनी स्विकारलली वैचारिक भूमिका आणि त्यांच्यातील आधुनिक विज्ञानवाद वाढीस लागल्याचे दर्शविते. हिंदू बहुजन हा सत्ता आणि इतर कोणत्याही अमिषाला भुलत नाही. जे काही लोक संघ भाजपच्या हाती लागतात ते बहुजनात नेतृत्त्व करण्यास कधीही सक्षम नसतात. भाजप महाराष्ट्रात सत्तासीन झाल्यानंतर त्यांनी ज्या व्यक्तींना मंत्रीपदावर आणले तेच लोक त्यांना त्या-त्या समाजातील नेतृत्व वाटू लागले आहेत. वास्तविक भाजप मधील मंत्र्यांच्या नावावर कटाक्ष टाकला तर मुख्यमंत्री आणि काही दोन तीन मंत्री सोडले तर कोणीही व्यक्ती सामाजिक नेतृत्व करीत असल्याचेे आपणास आढळणार नाही. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना जातीचा गटनेता म्हणून मंत्रीमंडळात स्थान मिळले, असेच स्वरुप सध्याही आहे. या देशात ब्राह्मणी अब्राह्मणी वाद करणार्‍यांला जातीयवादी संबोधण्याची नवी ब्राह्मणी परंपरा रुजू पाहते. ज्या देशाचा पाच हजार वर्षांचा इतिहास ब्राह्मणी-अब्राह्मणी संघर्षाचा आहे, ते न पाहता या वास्तवाला कसे नाकारु शकतात. राज्यपध्दती ही संविधानाबरहुकूम चालावी अशी हिंदू बहुजनांची अपेक्षा आहे. परंतु विकास किंवा अन्य कोणत्याही कामांविषयी न बोलता भलत्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सरकार धजावते. आता शिक्षणाच्या प्रश्‍नावर त्याने असे निर्णय चालविले आहेत की, ज्यामुळे हिंदू बहुजन समाजातील विद्यार्थी शिक्षणापासून कसे वंचित होतील हे यांनी पाहिले आहे. पण दुसर्‍या बाजूला ब्राह्मणी समुदायातील काही विद्यार्थी आदिवासींचे जात प्रमाणपत्र मिळवून वैद्यकिय शिक्षण घेत असल्याचे उघड झाले आहे. नागपूर विद्यापिठात सहा ब्राह्मण प्राध्यापक दलित म्हणून नोकरी करित असल्याचे कॉस्ट्राईबचे नेते कृष्णा इंगळे यांनी चव्हाट्यावर आणली होती.