अवैध धंद्यांची ‘महा’जनकी उद्ध्वस्त
मुंबई-नाशिक, विशेष/प्रतिनिधी, दि. 23 - शहराला कायदा सुव्यवस्थेचे वळण लावण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने उघडलेल्या मोहिमेचे नागरिक स्वागत करून सहकार्य करत असताना पोलिस खात्यातीलच काही ‘खा’की गद्दार जगन्नाथन यांच्या जिगरबाज पथकाच्या निश्चयाला सुरुंग लावत असल्याचे मुंबईनाका पोलिसठाण्याच्या हद्दीत झालेल्या कारवाईतून सिद्ध झाले आहे.सामान्य नागरिकांना कायदा आणि सुव्यवस्थेची ‘महा’जनकी शिकविणार्या या पोलिसाठाण्याच्या आशिर्वादानेच मुंबईनाका परिसरात अवैध धंदे सुरू आहेत याची खात्रीशिर माहिती
जगन्नाथन यांच्या पथकाला मिळाल्याने ही कारवाई करताना मुंबई नाका पोलिसठाण्याला जाणीवपुर्वक दूर ठेवण्यात आले आणि परिणामी एक मोठी कारवाई यशस्वी झाली. गायकवाडनगर परिसरात जुगाराचा भव्य ‘सेट’ एका राजकीय पदाधिकार्याच्या संचालनाखाली सुरू असल्याची खबर पोलिस आयुक्तालयाला मिळाली. या भागात जुगार अड्डाच नाही तर अन्य अवैध धंदेही सुरू आहेत अशीही माहिती पोलिसांकडे आहे मात्र पोलिसठाण्यातीलच काही गद्दार या अवैध धंद्यांच्या सातत्याने संपर्कात असल्याने धंदेचालक बिनधास्तपणे आपला व्यवसाय चालवीत असल्याचे बोलले जात आहे.
नागरिकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेला काल टाकलेल्या छाप्यात मुंबईनाका पोलिसठाण्याच्या गुन्हे पथकात कार्यरत असलेला एक खाकीचा शिपाईच पकडला गेल्याने दुजोरा मिळाला. या अड्ड्याला मुंबईनाका पोलिसठाणे सोडून भद्रकाली, पंचवटी, सरकारवाडा आणि गुन्हे शाखेच्या निवडक फौजेची मदत घेण्यात आली. चारही बाजूने कोंडी केल्यामुळे शहरातील 30 ते 35 प्रतिष्ठीत व्यावसायिकांसह मुंबईनाक्याचा शिपाई पकडण्यात यश आले. सोबत 15 लाखांची रोकडही जप्त झाली. मुंबईनाका पोलिसठाणे अस्तित्वात आल्यानंतर या भागात कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडवणार्यांना चाप बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. तथापि ही अपेक्षा फोल तर ठरलीच उलट अवैध धंद्यांना ऊत येऊन सामान्य नागरिकांवर होणार्या अन्यायाची विशेषत: महिलांवर होणार्या अन्यायाची दाद मागणेही कठीण झाले. काही दिवसांपूर्वी एका महिलेचा किरकोळ अपघाताच्या कारणावरून झालेल्या विनयभंगाची तक्रार दाखल करण्यासही मुंबईनाका पोलिसांनी नकार दिला होता. पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील शहरात दाखल झाल्यापासून कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडविणार्या लतखोरांना चांगलाच चाप बसत असून अवैध धंद्यांची महाजनकी करणार्यांनाही वेसन घातली जात आहे. मुंबईनाका परिसरात झालेल्या मोठ्या कारवाईचे नाशिककर स्वागत करीत आहेतच मात्र जुगार अड्ड्यात सापडलेल्या आरोपींना कायद्याने तत्काळ जामीन देण्याची तरतूद आहे. परिणामी प्रतिष्ठेला धक्का लागण्याव्यतिरिक्त कायद्याने या जुगार्यांचे विशेष नुकसान होत नाही मात्र या कारवाईत अटक केलेल्या खाकी वर्दीच्या शिपायाला जगन्नाथन कुठली ‘समज’ देणार हा नाशिककरांसाठी औत्सुक्याचा प्रश्न आहे.