Breaking News

युरो कप फुटबॉल स्पर्धेसाठी पूजा ढमाळ हिची निवड

खंडाळा, दि. 19 (प्रतिनिधी) - परिस्थिती बेताची असताना केवळ जिद्दीच्या जोरावर खंडाळा तालुक्यातील खंडाळा तालुक्यातील असवली येथील पूजा ज्ञानेश्‍वर ढमाळ हिची 18 वर्षांखालील गटामध्ये जागतिक युरो कप फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली. 
ग्रामीण भागातील मुलीने खेळ व बुध्दिमत्तेच्या जोरावर गावाचे नाव सातासमुद्रापलीकडे कोरले आहे. पूजाचे वडील मुंबई येथे बीएसटीमध्ये चालक म्हणून
काम करतात. तिचे कुटुंबिय मुंबई येथे वास्तव्यास आहे. ती सेंट ऑगस्टी शाळेत शिक्षण घेत असताना तिच्या कामगिरीमुळे शाळेने फुटबॉल प्रशिक्षण मोफत दिले आहे. पूजा हिला असवली ग्रामस्थांसह राजू ढमाळ, किशोर ढमाळ, अभिजित ढमाळ, सचिन जगताप, अशोक सरगर, नरेंद्र घाडगे, निलेश कापडी, मानसिंग ठाकूर, शोभा जाधव, नीता सोनटक्के, मनीषा पुरळेकर, संतोष मोरे व सहकारी युवक प्रतिष्ठानने आर्थिक मदत केली. पूजा 18 वर्षांखालील गटात जागतिक स्तरावर श्रीलंका, दिल्ली येथे फुटबॉल खेळली आहे. सध्या ओडिशा येथे नॅशनल फुटबॉल खेळून डेन्मार्कला रवाना झाली आहे. तिची स्ट्रायकर म्हणून युरो कप फुटबॉल खेळात निवड झाली आहे. तिला हेमंत झेंडे, सुनील पुजारी यांनी प्रशिक्षण दिले. असवली येथील पूजा ढमाळ हिने फुटबॉलमध्ये उंच भरारी घेतल्याने दत्तानाना ढमाळ मित्र परिवार, सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.