Breaking News

जिल्ह्यात ईद उत्साहात साजरी

सांगली, दि. 09 -  नवीन कपडे परिधान करून एकमेकांची गळाभेट घेत देण्यात येणार्‍या शुभेच्छा.. शिरकुम्र्यासाठी होणारा आग्रह.. आणि नातेवाईकांच्या घरी जाऊन दिल्या जाणार्‍या शुभेच्छा.. अशा उत्साही वातावरणात गुरुवारी शहरात रमजान ईद साजरी करण्यात आली.
मुस्लिम समाजाचा सर्वात पवित्र असलेला रमजान ईदचा सण शहरात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. ईदनिमित्त नमाज अदा करण्यासाठी येथील जुना बुधगाव रस्त्यावर असलेल्या ईदगाह मैदानावर शहरातील मुस्लिम बांधवांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. याबरोबरच शहरात इतर ठिकाणीही नमाज अदा करण्यात आली. यावेळी मुस्लिम धर्मगुरूंनी ईदचे महत्त्व सांगितले. यावेळी हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते.
त्यानंतर आमदार सुधीर गाडगीळ, माजी मंत्री प्रतीक पाटील, कॉँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आदींनी ईदगाह मैदानाबाहेर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दिवसभर शहरात एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्वत्र गर्दी झाली होती.
मिरजेत मुस्लिम बांधवांनी शहरातील विविध ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण केले. मशिदीतही सकाळी विशेष नमाज पठण झाले. ईदगाह मैदानावर नमाज पठणासाठी हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते. मौलाना महंमद गौस खतीब यांनी खुदबा पठण व हफीज महंमद हनिफ मुल्ला यांनी नमाज पठण केले. पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील, पोलिस निरीक्षक बाजीराव पाटील, माजी आमदार हाफिज धत्तुरे, पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रमोद इनामदार, प्रकाश इनामदार, मनोहर कुरणे, गजेंद्र कुळ्ळोळी, राजू सरवदे, विष्णुपंत गवंडी, रफिक मुजावर, असगर शरीकमसलत, शकील पटेल, अय्याज नायकवडी यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ईदनिमित्त मार्केट परिसरात जिलेबी व मिठाईचे वाटप, गरिबांना ईद कीटचे वाटप करण्यात आले. सुभाषनगर येथे राष्ट्रीय समाजसेवा संघटनेतर्फे ईदनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. महंमदतल्लाह माणिकभाई, हुसेनखान पठाण, जमीर सय्यद, नितीन फराज, रोहन धेंडे, जसिन सय्यद, तौफिक सय्यद, अमन सय्यद उपस्थित होते.