Breaking News

कांबळेच्या खून प्रकरणी फरारी दुर्गेशसह 9 जणांना अटक

सांगली, दि. 09 - येथील गोकुळनगरमध्ये रवींद्र कांबळे याचा खून करुन फरारी झालेला मुख्य संशयित दुर्गेश पवारसह नऊजणांना पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला रात्री यश आले. खुनानंतर सर्व संशयित फाटाफूट होऊन फरार झाले होते. त्यांना कोल्हापूर, किर्लोस्करवाडी (ता. पलूस) व तासगाव रस्त्यावरील पाचवा मैल फाट्यावरुन पथकाने ताब्यात घेतले. यामध्ये आणखी तिघांची नांवे निष्पन्न झाली आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके कर्नाटकात रवाना झाली आहेत. अटक केलेल्यांमध्ये दुर्गेश नागाप्पा पवार (37), परशा उर्फ प्रशांत नागाप्पा पवार (21), प्रशांत दुर्गाप्पा पवार (26), नागेश उर्फ काळू दुर्गाप्पा पवार (24), मोना उर्फ यल्लाप्पा बापू पवार (36), मारुती उर्फ अशोक मसू पवार (20), अमोल गंगाप्पा कुंचीकोरवी (20) व अशोक बाळाराम जोंधळे (31, सर्व रा. वडर कॉलनी, सांगली) यांचा समावेश आहे. दुर्गेश व त्याचा भाऊ प्रशांत हे दोघे कोल्हापुरातील ताराबाई पार्क वसाहतीत आश्रयाला होेते. प्रशांत व नागेश पवार हे पाचवा मेल फाट्यावरुन कर्‍हाडला पळून जाण्याच्या तयारीत होते, तर अन्य पाचजण किर्लोस्करवाडी येथील रेल्वे स्टेशनजवळ सापडले. या सर्वांना दुपारी पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना 11 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाच्या परिसरात दुर्गेश पवार तसेच मृत रवींद्र कांबळेच्या साथीदारांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे तणाव होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.