कोपर्डीप्रकरणातील आरोपींना फाशी द्या
। सेना, राष्ट्रवादी, मनसे, हिंदूसेना,संभाजी ब्रिेगेड,शिवप्रहार, छावा, मराठा सेवासंघ, यांच्यासह विविध संघटनांचा निषेध मोर्चा
अहमदनगर (प्रतिनिधी) । 19 - कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करुन तिचा खून केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद सोमवारी जिल्ह्यात सर्वत्र उमठले. माणुसकीला काळींमा फासणार्या घटनेच्या निषेधार्थ सेना, राष्ट्रवादी, मनसे, हिंदूसेना,संभाजी ब्रिेगेड,शिवप्रहार, छावा, मराठा सेवासंघ, यांच्यासह विविध संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून संताप व्यक्त करण्यात आला. मोर्चेकरांच्यावतीने जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना निवेदन देण्यात आले.कोपर्डीतील घटना निंदणीय असून समाजाला काळींमा फासणारी आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सदर प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालून आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत. सदर प्रकरणात आरोपींची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर आरोपींना अटक करावी, आरोपींना लवकरात-लवकर फाशी होण्यासाठी विशेष विधितज्ज्ञांची नेमणूक करावी. अशा मागण्या सर्वच संघटनांची निवेदनात केल्या आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य संभाजी दहातोंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, जिल्ह्यात ग्रामीण भागात महिला अत्याचार, खुन, यासारखे गुन्हे सातत्याने घडत आहेत. कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार झाला. संपुर्ण कुटूंब व जिल्हा भयभीत झाला आहे. नराधमास फाशीची शिक्षा मिळण्यासाठी पोलिस यंत्रणेद्वारे सक्षम पुरावे व तपास व्हावा, सदर कुटूंबास शासनाकडून तातडीने रुपये 25 लाखांची मदत करावी व अत्याचारीत मुलीच्या कुटूंबाचे पुर्नवसन करुन सात्वंन करावे. निवेदनातील मागणीप्रमाणे शासनाने न केल्यास मराठा महासंघाच्यावतीने येत्या 21 जुलै रोजी मुंबई येथील वर्षानिवास स्थानी आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
मराठा सेवासंघाच्या विविध संघटनांच्यावतीने काळ्याफिती लावून मुखमोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्यापासून काढण्यात आला. आंदोलन कर्ते पंचपीरचावडी, जुना मंगळवारबाजार, मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.आंदोलनात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मोर्चा निघणार असल्याने पोलिस प्रशासनाच्यावतीने मोठा पोलिस बंदोबस्त शहरात विविध ठिकाणी तैनात करण्यात आला होता. बंदोबस्तासाठी इतर जिल्ह्यातीलही पोलिस अधिकारी आले होते. कोतवालीच्यावतीने बंदोबस्तावरील पोलिस कर्मचार्यांना फुटपॅकेट देण्यात आले.
