Breaking News

ब्राह्मणी संस्कृतीचा सामाजिक विस्तार खुंटला...

भारतीय समाजव्यवस्था जातीव्यवस्थेत पूर्णपणे बंदीस्त होवून जवळपास चौदाशे वर्षांचा काळ लोटला. जातींची उतरंड वर्णव्यवस्थेप्रमाणे ठेवल्यानंतर सर्वात  तळाचा किंवा शेवटचा अथवा चौथा वर्ण म्हणून असणार्‍या शूद्रांना अनेक जातीत विभागले गेले. परंतु जातीव्यवस्थेत विभाजन झाल्यानंतर ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर  संघर्ष सुरु झाला नाही, तर तो त्यापूर्वी गण समाज व अगणी समाज यांच्या रचनेतही आर्य-क्षत्रिय आणि दास असा होता. शेतीशी निगडीत असलेला क्षत्रिय  समाजाच्या शेतीविषयक संस्कृतीला आर्यांनी आपल्या समुहात उलट्या पध्दतीने आणले. क्षत्रिय समाज शेतीच्या संस्कृतीचे प्रतिकात्मक उत्सव सोहळे साजरा  करीत असे. तर ब्राह्मणी संस्कृतीने त्या महोत्सवाला स्वत:च्या संस्कृतीत आणून कर्मकांडाचे रुप दिले. कर्मकांडाची संस्कृती ही पुरुष सूक्त येईपर्यंत फारशी स्पष्ट  नव्हती. परंतु पुरुष सूक्तानंतर ब्राह्मणी संस्कृतीने शेतीशी निगडीत असलेल्या क्षत्रियांनाही धर्मसत्ता लादून कर्मकांडाच्या मागे लावले. मात्र या कर्मकांडाला गण  समाजातून प्रथम विरोध झाला. हा विरोध गण समाजाचा नायक म्हणून इसवी पूर्व नवव्या शतकात श्रीकृष्णाने केला. कृष्णाला ब्राह्मणी संस्कृतीने म्हणून अधिक  बदनाम केले. वास्तविक कृष्ण हे नाव कृषक समाजाचे वैशिष्ट्य दर्शविणारे आहे. परंतु ब्राह्मणी संस्कृतीने कृष्ण याचा अर्थ काळा असा सांगितला. तिथी सांगताना  त्यांनी चंंद्र गणनेनुसार महिन्याला दोन पक्षात विभागले. एक म्हणजे शुक्ल पक्ष दुसरा कृष्ण पक्ष. चंद्र कलेकलेने वाढत जाणारा व रात्रीला प्रकाश देणारा पंधरवडा   म्हणून त्यांनी त्याला शुक्ल पक्ष ठरवले तर चंद्र कलेकलेने लहान होत जावून रात्रीस अंधकाराचे साम्राज्य असणार्‍या पंधरवड्याला त्यांनी कृष्ण पक्ष म्हटले. तसे  पाहिले तर ब्राह्मणी संस्कृतीबरोबर कृष्णाचा तीव्र संघर्ष झाल्याचा हा इतिहास दाखवतो. पण हिंदू बहुजन समाज या ब्राह्मणीकाव्याला खर्‍या अर्थाने कधीही समजू  शकला नाही. हिंदू बहुजनांच्या देवतांचा स्वीकारही ब्राह्मणी संस्कृतीने कधी केलेला नाही. श्रीकृष्णाने कृषीपूरक जनावरे ब्राह्मणी संस्कृतीकडून यज्ञात बळी दिले  जाण्यास विरोध केला होता. या विरोधाचा आवाज एवढा बुलंद होता की तेव्हापासुन हे स्पष्ट झाले की ब्राह्मणेतर समाजाने ब्राह्मणी संस्कृतीच्या कर्मकांडाचा कधीही  स्वीकार केला नाही. पण आज हीच ब्राह्मणी संस्कृती मथुरेच्या कृष्ण मंदिराचा प्रश्‍न हाती घेवून पूर्वाश्रमीच्या शूद्रांना म्हणजे आजच्या ओबीसी समुदायाला  ऐतिहासिक अज्ञानात नेण्याचा प्रयत्न करीत आहे. आज राजकीय सत्ता ब्राह्मणी निर्णयसत्तेकडे सरकली असली तरी त्यात ओबीसी समुदायाची शक्ती मोठी आहे.  हिंदू बहुजन संस्कृती आता एवढी प्रगल्भ झाली आहे की वैदीक संस्कृतीला म्हणजे ब्राह्मणी संस्कृतीला तो ठासून विरोध करु लागला आहे. याची परिणीती  राजकीय भाषेतही अलिकडे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान काँग्रेस नेते नारायण राणे यांनी सध्याच्या सत्ताधारी राजकीय  पक्षात बहूजन समाजाला योग्य स्थान नसल्याची कबुली दिली होती. तर माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही बहुजन समजाला राजकीय सत्तेत  सामावून घेण्यात सध्याचे सत्ताधारी कमी पडत असल्याचे बोलले. याचप्रमाणे राष्ट्रवादीचे काही नेते खासगी चॅनल्सवर चर्चा करताना मूलनिवासी ही संकल्पना हिंदू  बहुजन समाजासाठी वापरत आहेत. याचा अर्थ ब्राह्मणी संस्कृतीला सध्या राजकीय यश मिळालेले दिसले असले तरी सामाजिक विस्तार त्यांचा दुरावत आहे.  कारण हिंदू बहुजन समाज आता आपल्या इतिहासाचे अध्ययन करु लागला असून ते समजूनही घेवू लागला आहे.