Breaking News

निर्भया ते कोपर्डी !

महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुशीत तयार झालेल्या महाराष्ट्रात आजही स्त्री अत्याचाराच्या घटनेत घट  होतांना दिसून येत नाही. 16 जुलै 2016 रोजी अहमदनगर जिल्हयातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार  करणारी, माणुसकीला काळीमा फासणारी, अमानवीय घटना घडली आहे. कायद्याचा धाक राहिला नाही, का अशीच शंका निर्माण होत आहे. या गुन्हयातील  आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हायला तर हवीच आहे, पण ही घटना पुन्हा एकदा एक गलिच्छ सत्य अधोरेखित करत आहे. प्रत्यक्ष घटनेपेक्षा ज्या प्रकारे  बलात्कार झालाय ती मानसिकता समाजात फोफावतेय हे खूप चिंता करण्यासारखे आहे. समाज मूळ मुद्यालाच बगल देत आहे, हे सर्वात विघातक प्रवृत्तीचे लक्षण  आहे. ती मुलगी केवळ विशिष्ट जातीची असल्यामुळे  या घटनेकडे बघण्यांचा काहींचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो, मात्र हा एका विशिष्ट जातीतील स्त्रियांच्या  सुरक्षेचा प्रश्‍न नसून, तो समस्त स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्‍न आहे. मग ती स्त्री कोणत्याही जाती धर्मातील असेल. एका आपल्याच भगिनीची विटंबना झाली बलात्कार  झाला म्हणून पेटून उठणे गरजेचे आहे, तो जातभिमान बाजूला ठेवून. त्या मुलीवर अत्यंत विकृत पद्धतीने बलात्कार केला गेला, ही अमानवीय घटना आहे.  वासनांध झालेली ही विकृती समाजात वाढत चालली आहे. त्याला ठेचण्यासाठी सर्वांनी आपला जाताभिमान बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज  आहे.चुकीचे आहे.  या घटनांचा केवळ राजकीय उद्देशासाठी वापर नको. याप्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न ही काही जणांकडून होत आहे. मात्र या  प्रकरणात सर्वच जाती धर्मातील व्यक्तीकडून कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. कुठल्याही समाजातील मुलीसोबत असा प्रकार होऊ नये यासाठी आपण कठेार  भूमिका घ्यायला हवी. जात पाहून अत्याचार मोजला जाणे ही अत्यंत शरमेची आणि लाजीरवाणी गोष्ट आहे. आहे. माणुसकीच्या नजरेतून पहाण्याची गरज असून,  अशा आरोपींची खरच गय करण्याचा, त्यांना पाठीशी घालण्याचा प्रश्‍नच नाही, आणि तो कोणीही करू नये. नववीत शिकणार्‍या उत्कृष्ट कबड्डीपटू असणार्‍या या  कोवळ्या जीवाचे लचके तोडणार्‍या क्रुर नराधमांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे. जितक्या वेदना त्या मुलीला दिल्या त्यापेक्षाही अधिक वेदना  त्या गुन्हेगारांना आयुष्यभर दिल्या पाहिजेत. गावकर्‍यांच्या सतर्कतेमुळे एक गुन्हेगार पकडल्या गेला, तर पोलिसांनी त्याचे दोन साथीदार शोधून अटक केले. या  कृत्यातील सर्व नराधमांनावर फास्टट्रॅक कोर्टात हा खटला चालवावा आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा ठोठवावी. राज्यातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्‍न दिवसेंदिवस  बिकट होत चालला आहे. इतक्या क्रुर आणि पाशवी पद्धतीने आमच्या माय-बहिणीवर बलात्कार - खून होत असताना, पोलिस प्रशासन नेमके काय करतात हा  मोठा प्रश्‍न आहे. नगर जिल्हयात अत्याचाराच्या घटनांत दिवसोंदिवस वाढ होत चालली आहे. मात्र त्यावर उपाययोजना राबवण्यात सरकार नावाचा प्रपणी, आणि  प्रशासन कमी पडत आहोत. मुख्यमंत्र्यांकडे गृहखात्यासारखे महत्वाचे खाते आहे, मात्र त्याकडे त्यांचे लक्ष नाही. गृहखात्याला जर पुरेपूर न्याय देवू शकत नसेल  तर त्या खात्याला पुर्णवेळ मंत्री देण्याचे सौजन्य मुख्यमंत्र्यांनी दाखवण्याचे गरज आहे. ती मुलगी विशिष्ट समाजातील आहे म्हणून या घटनेकडे कोणी बघू नये. ती  एक मुलगी आहे, आणि तिचे लचके तोडणारे कुत्रे हे विकृत मानसिकतेचे आहेत. माणुसकीचा कोणताही गुणधर्म त्यांच्यात आढळून येत नाही, त्यामुळेच असे कृत्य  करण्याचे त्यांचे धाडस झाले आहे, अशी ही विकृतीची विषवृल्ली प्रत्येक जातीत, समूहात वाढत चालली आहे. त्यामुळे या विकृतीला ठेचण्याची गरज आहे. त्यामुळे  या विकृतीला नष्ट करण्यासाठी आपण सर्व जातीधर्माच्या लोकांनी पुढे आले पाहिजे. स्त्री अत्याचारविरोधी कायद्यातील तरतूदीवर फेरविचार करून त्यात कठेार  शिक्षेची तरतूद करण्याची गरज आहे. फडणवीस सरकारने यात लक्ष घालून याच अधिवेशनात बलात्कार करणार्‍या नराधमांना कठोर शिक्षेची तरतूद करावी,  राज्यातील महिलांना सुरक्षित वाटेल, असा पोलीस खात्याचा वचक निर्माण करण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अन्यथा परत अशा अनेक निर्भया वासनांध  झालेल्या कावळयांच्या तावडीत सापडतील, आणि समस्त माणुसकीचे लक्तरे वेशीवर टांगले जातील, त्यामुळे वेळीच सावध होण्याची गरज आहे.