Breaking News

खासगी क्षेत्राच्या निरुत्साहामुळे गुंतवणुकीचे चक्र संथ

नवी दिल्ली, दि. 06 - खासगी क्षेत्राने गुंतवणुकीचे मनावर घेतले नसल्याने गुंतवणुकीचे चक्र फिरत नसल्याचे वास्तव सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने  दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. खासगी कंपन्यांना गुंतवणूक करण्याची घाई नसल्याने सारेच गाडे अडले आहे. जूनपर्यंतच्या तीन महिन्यातील हे निरीक्षण  आहे. आर्थिक वर्ष 2017 मध्ये 1.30 लाख कोटी रुपयांचे नवे प्रकल्प येत असून आर्थिक वर्ष 2016 मध्ये 2 लाख कोटी रुपयांचे नवीन प्रकल्प होते.
स्थगित ठेवलेल्या प्रकल्पांची किंमत आतापर्यंतची सर्वात जास्त म्हणजे 11.2 लाख कोटी रुपये आहे. यातील तीन चतुर्थाश प्रकल्प हे खासगी कंपन्यांनी प्रवर्तित  केलेले आहेत. नियामकांकडून मंजुरी न आल्याने अथवा कच्च्या मालाच्या अपु-या पुरवठयामुळे प्रकल्प रखडले आहेत. त्याहीपुढे जाऊन बहुतांशी प्रवर्तक  कंपन्या व्हेंचर सुरू करण्यास आवश्यक असलेला निधी जमवू शकलेले नाहीत.
बँकांकडून उद्योगांनी कर्ज उचलण्याचे प्रमाणही 9 ते 10 टक्के इतकेच आहे. प्रकल्पांसाठी कर्ज घेण्यास फारशा कंपन्या येत नाहीत, असे बँकांनी सांगितले.  अर्थव्यवस्थेची वाढ संथगतीने होत आहे, हे बहुतेक सारे निदर्शक लक्षणे सांगत आहेत. औद्योगिक उत्पादनाचा 38 टक्के निर्देशांक बनवणा-या 8 प्रमुख क्षेत्रांचा  निर्देशांक मेमध्ये अवघ्या 2.8 टक्के इतका वाढला तर गेल्या वर्षी हाच निर्देशांक 4.4 टक्के होता.