Breaking News

पाटणाचा यू-मुंबावर तर बंगालचा जयपूरवर विजय

कोलकाता, दि. 17 - प्रो कबड्डील लीगच्या चौथ्या सत्राच्या सहाव्या लेगला  शनिवारपासून सुरूवात झाली शनिवारी झालेल्या दुसर्‍या सामन्यात यू-मुंबाला पटणा  पायरेट्सकडून तर पहिल्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सला आपल्या घरच्या मैदानावर बंगाल वॉरियर्सने सुरेख खेळ करत लीगलमधील दुसर्‍या विजयाची नोंद  केली. बंगळुरूच्या लेगमध्ये  सुंदर खेळ करून मुंबाला विजय मिळवून देणार्‍या अनुप कुमार आणि राकेश कुमार या जोडीला समाधानकारक कामगिरी करता  आलेली नाही. पाटण्याने 34-24 असा विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.
कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडा संकुलातील लढतीत पाटण्याने सुरूवातीला आघाडी घेत सामन्याची उत्सुकता संपवून टाकली. राजेश मोंडल  आणि प्रदीप नरवा
ल यांनी प्रत्येकी दोन चढाईत यू मुंबाच्या 5-5 खेळाडूंना बाद केले. त्यांच्या या कामगिरीच्या जोरावर पाटण्याने मध्यंतराला 19-8 अशी  आघाडी घेतली. दुसर्‍या सत्रात यू मुंबा प्रतिकार करेल असे वाटत होते, परंतु त्यांच्याकडून नीरस खेळ झाला. पायरेट्सचा कर्णधार धर्मराज चेरालथनने एक सुपर  पकडीसह 7 गुण पटकावले. त्याला फैझल अत्राचली (3), बाजिराव होडगे (2) आणि कुलदीप सिंग (2) यांची पकडीत चांगली साथ लाभली. कुलदीपनेही एक  सुपर पकड केली. चढाईत राजेश (8) आणि प्रदीप (4) यांनी सर्वोत्तम खेळ केला. यू मुंबाचा कर्णधार अनुप 15 पैकी 2 चढाईत यशस्वी ठरला, तर राकेश  कुमारच्या दोन्ही चढाई अयशस्वी ठरल्या.
दरम्यान पहिल्या लढतीत अव्वल स्थानी असणार्‍या जयपूरचा पराभव करीत उपात्यं लढतीसाठी आपणही शर्यतीत आहोत असे बंगाल वॉरियर्सने दाखलवून दिले.  यांग कुन लीच्या आक्रमक खेळाच्या जोरावर बंगाल वॉरियर्सने घरच्या प्रेक्षकांसमोर जयपूर पिंक पँथर्सवर 32-25 असा विजय मिळवला. कून लीने 15 चढाईत 8  यशस्वी चढाया करत 12 गुणांची कमाई केली, तर पकडीतही त्याने एक गुण पटकावला. त्याला सुरजित नरवाल (6) आणि कर्णधार निलेश शिंदे (4) यांनी  चांगली साथ दिली.