Breaking News

उपवनसंरक्षक कार्यालयाने केली पशुपालक शेतकर्‍याची क्रुर थट्टा!

उपवनसंरक्षक, सहाय्यक वनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकार्‍यासह संबधितांवर कारवाईची मागणी

बुलडाणा, दि. 18 - हिंस्त्र वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात गाय मृत्यूमुखी पडल्यानंतर गाईच्या मालक पशुपालकास बुलडाणा प्रादेशिक वन विभागाने अतिशय तोकडी मदत देवून या पशुपालकाची क्रुर थट्टा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अतिशय तोकड्या मदतीच्या निमित्ताने वन विभागाचे उपवनसंरक्षक, सहाय्यक वनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी या अधिकार्‍यांसह कार्यालयीन कर्मचारी किती संवेदनहीन असतात याची प्रत्यक्षात प्रचिती आली असून एरव्ही प्रचंड प्रमाणावर नियमबाह्य कामे व खाबुगिरी करणारे लालफितशाहीतील अधिकारी शेतकरी

पशुपालकास नियम, अटींचा कसा त्रास देवून त्याला कमीत कमी मदत मिळेल अशी संगनमताने व्यवस्था जोपासतात हे देखील यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. या संदर्भात राज्याचे शेतकर्‍यांचे कैवारी असलेले वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी वन खात्याच्या संबधित अधिकारी व कर्मचार्‍यांना लालफितशाहीच्या हेकेखोरपणाबद्दल व असंवेदनशीलतेबद्दल तसेच दुष्काळाच्या गर्तेत पशुधन गमावून बसलेल्या पशुपालक शेतकर्‍याच्या क्रुर थट्टेबद्दल जाब विचारावा अशी मागणी आहे.
यासंदर्भात प्राप्त झालेली माहिती अशी की, वरवंड, ता.जि. बुलडाणा येथील शिवाजी सखाराम तांगडे या आर्थिक विपन्नावस्थेत असलेल्या पशुपालक शेतकर्‍याच्या सुमारे पंचविस ते तीस हजाराहून अधिक किंमत असलेल्या गाईवर बिबट्याने एक महिन्यापूर्वी हल्ला चढविला. वरवंड शिवारातील शेतात घडलेल्या बिबट्याच्या या हिंस्त्र हल्ल्यात संबधित गाईचा मृत्यू झाला. त्यानंतर हि घटना वन विभागाला कळविण्यात आली. वन विभागाच्या अधिकार्‍यांनी व पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी मृतक गाईचा पंचनामा केला. बुलडाणा वनपरिक्षेत्र अधिकार्‍याच्या कार्यालयाने संबधित पशुपालकास किमान दहा हजाराची नियमानुसार मदत मिळेल असे आश्‍वासन दिले. बुलडाणा वनपरिक्षेत्र अधिकार्‍याने हे प्रकरण सानुग्रह मदतीच्या पुढील कार्यवाहीसाठी सहाय्यक वनसंरक्षक बुलडाणा व उपवनसंरक्षक बुलडाणा यांच्याकडे पाठविले. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पाळीव पशु जसे गाय, बैल, म्हैस, कालवड अशा प्राण्यांचा मृत्यू झाल्यास उदार दृष्टिकोन ठेवून जास्तीत जास्त म्हणजे दहा हजार मदत द्यावी असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र बुलडाणा वनविभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक, उपवनसंरक्षक यांनी या निर्देशांना काळीमा फासत आपल्या चुकीच्या आकलन शक्तीचे बुध्दीवान दिवे पाजळत संबधित पशुपालक शेतकर्‍याला  केवळ पाच हजाराची नाममात्र तोकडी मदत देवून या पशुपालकाची क्रुर चेष्टा केली. एरव्ही खासगी मालमत्तेच्या वृक्षतोडीत, वृक्ष तोडीची परवानगी देण्यासाठी, झाडावर परिपक्वतेचे हॅमर मारण्यासाठी, वाहतुक परवाने देण्यासाठी तसेच वन जलसंधारणाच्या कामात त्याचप्रमाणे अवैध वृक्षतोडीच्या, वाहतुकीच्या केसेस कंपाऊंड करण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये खाबुगिरी व लाचखोरी करणार्‍या या अधिकार्‍यांनी संबधित पशुपालकास त्याच्या गाईच्या मृत्यूबद्दल तोकडी मदत देवून काय साधले असा प्रश्‍न यानिमित्ताने विचारला जावू लागला आहे. ही तोकडी मदत घ्यावी की शासनाला परत करुन वन खात्याचे उपकार टाळावेत असा प्रश्‍न संबधित शेतकर्‍यापुढे निर्माण झाला आहे. यासंदर्भात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबधित उपवनसंरक्षक, सहाय्यक वनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी यांना जाब विचारावा अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.