बुलडाणा ते श्री क्षेत्र माकोडी पायी वारीचे आयोजन
बुलडाणा, दि. 08 - राम नामाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपल संपुर्ण आयुष्य खर्ची घालत असलेले समर्थ सद्गुरु श्री श्रीहरी महाराज माकोडी यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाणा ते श्रीक्षेत्र माकोडी पायीवारी सोहळा भाविकांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. 11 जुलै रोजी सकाळी 7 वाजता पायीवारी निघणार आहे. मलकापूर रोडवरील गणेश नगरस्थित साईराम मंदिर येथून यावारीला सुरुवात होईल. 11 ला राजूर मार्गे वाघजाळफाटा, मोताळा येथे वारी पोहचेल. मोताळा येथे मुक्काम झाल्यावर दुसजयादिवशी 12 जुलैला डिडोळाफाटा ते शेलापूर मार्गे सायंकाळ दरम्यान वारी श्रीक्षेत्र माकोडी येथे पोहचेल. दरम्यान अकोला,खामगाव, जळगाव जामोद, शेंबा व परिसरातील पायी दिंड्या शेलापूर येथून एकत्रितरित्या माकोडी पर्यंत सोबत चालतात. आषाढ शुध्द नवमी अर्थात 13 जुलै रोजी समर्थ सद्गुरु श्रीहरी महराज यांचा वाढदिवस असल्याने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन चैतन्यमंदिर परिसरात करण्यात आले आहे. पहाटे काकडा आरती त्यानंतर पाद्यपुजा, मंगलसकन यासह दुपारी महाप्रसादाचे वितरण भाविकांना केले जाईल. नाम जपाचा कार्यक्रमही नियत्यनियमाने सुरुच राहणार आहे. दरम्यान डॉ. खंडागळे यांचे स्वअनुभवाचे प्रवचन देखील होणार आहे. भाविकांनी पायीवारीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम उपासक मंडळ यांनी केले आहे.
