Breaking News

100 सर्कलचा विकास आराखडा

बुलडाणा, दि. 08 - भारताच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण भागात सोई-सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय रुरबन मिशन अंतर्गत सर्कलनिहाय आढावा घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात देशातील शंभर जिल्हा परिषद सर्कल निवडण्यात आले आहे. राज्यातील सात सर्कलमध्ये खा.प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सुलतानपूर सर्कलचाही यात समावेश झाला आहे. स्मार्ट खेड्यांसाठी 2022 पर्यंतच्या सोई-सुविधा अद्यावतीकरणाच्या अनुषंगाने राष्ट्रीय रुरबन मिशन हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात देशातील शंभर जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणा-या खेड्यांचा यामध्ये समावेश आहे. यात सिरसाला जि.बीड, जोेगेश्‍वरी जि.औरंगाबाद, वडोदा जि.नागपूर, लोणीकाळशेर जि.पुणे, सुलतानपूर जि.बुलडाणा, आष्टी जि.जालना व मुक्ताईनगर जि.जळगाव असे राज्यातील सात सर्कल आहेत. या बाबीसाठी खा. प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्र्यांकडे चर्चेदरम्यान मागणी केली होती. राज्यातील सातही सर्कलमध्ये एकात्मीक समुह कृती आराखडा तयार करण्यासाठी सिडको औरंगाबादला प्राधान्य देण्यात येणार आहे. आतापर्यंत सिडको शहरी शगातच काम करत होते. ग्रामीण भागातील आराखडे तयार करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ राहील. प्रत्येक सर्कलमध्ये 2022 पर्यंत काय सुविधा लागतील. सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपुरवठा, तिर्थक्षेत्रविकास, बाजारपेठा, रस्ते इतर मुलभूत सुविधा याबाबत अभ्यास करुन काय लागणार, किती निधी आवश्यक राहील याच्या अंतरभावातून आराखडा तयार होणार आहे. विशेष म्हणजे कोणते निधी ग्रामपंचायतीला मिळतात. काय योजना राबविल्या जावू शकतात, याचाही आढावा यात घेण्यात येईल. 30 टक्के रक्कम केंद्र देणार ग्रामपंचायतीच्या 14 वित्त आयोग, आमदार- खासदार निधी, ग्रामपंचायत फंड असा जवळपास 70 टक्के निधी या कामांसाठी सर्कलमधील खेड्यांना एकत्रीतरित्या संभाव्य विकास कामासाठी जमा करावा लागणार आहे. 30 टक्के रक्कम केंद्र सरकारकडून दिली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे डी.आर.डी.ए.विभागाचे प्रमुख अनुप शेंगुलवार यांनी यासंदर्भात दिली आहे. स्मार्ट खेड्यांसाठी हा उपक्रम- खा.जाधव सुलतानपूरचा समावेश रुरबन मिशनमध्ये झाल्याने जवळपास सर्कलमधील 12 खेड्यांचा आराखडा तयार होईल. ग्रामपंचायतींना यासाठी निधी उभारावा लागणार असून केंद्र शासनाकडून 30 टक्के निधी मिळणार आहे. त्यामुळे एकत्रीतरित्या उपाययोजनांद्वारे स्मार्ट खेडी देखील तयार होतील. राज्यातील 7 सर्कलमध्ये जिल्ह्याचाही 1 क्रमांक लागल्याने विशेष आनंद असल्याची प्रतिक्रिया खा.जाधव यांनी केली आहे.