Breaking News

अँडी मरे उपांत्य फेरीत

विंबल्डन, दि. 08 - अँडी मरेने फ्रेंच प्रतिस्पर्धी ज्यो-विल्फ्रीड त्सोंगा याचे नाट्यमय कडवे आव्हान पाच सेटमध्ये परतावून लावत विंबल्डनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. निर्णायक पाचव्या सेटमध्ये केवळ एक गेम गमावत मरेने बाजी मारली. हा सामना तीन तास 54 मिनिटे चालला.
मरेने कारकिर्दीत सातव्यांदा विंबल्डनची उपांत्य फेरी गाठली. पहिला सेट टायब्रेकमध्ये जिंकल्यानंतर मरेने दुसर्‍या सेटमध्येच एकच गेम गमावला होता. त्यानंतर दोन सेटच्या पिछाडीवरून त्सोंगाने प्रतिकार केला. पाचव्या सेटच्या प्रारंभीच त्सोंगाला ब्रेकपॉइंट मिळाला होता, पण त्याने ही संधी दवडली.
पहिला सेट अटीतटीचा झाला. 77 मिनिटे चाललेल्या सेटमध्ये मरेने तीन सेटपॉइंट वाचविले. दुसरा सेट मरेने 25 मिनिटांत जिंकला तेव्हा त्याची पकड भक्कम झाली होती. त्यानंतर त्सोंगाने मरेच्या ‘सेकंड सर्व्ह’वर फोरहँडने ताकदवान आक्रमण केले. त्याने एकमेव ब्रेकपॉइंटचा फायदा उठवीत पिछाडी कमी केली.